Maharashtra State Transport Corporation (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस संकटकाळात (Coronavirus Pandemic) राज्य परिवहन महामंडळाला (Maharashtra State Transport Corporation) मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता शासनाच्या विविध विभागांतर्फे होणारी खाजगी माल वाहतूकीच्या 25 टक्के माल वाहतुकीचं काम राज्य परिवहन महामंडळाला देण्यात येणार आहे. यासाठी मंत्रीमंडळाच्या उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती निर्णय अंलबजावणी तसंच महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचे काम करणार आहे.

त्याचबरोबर महामंडळाचा टायर्स पुन:स्तरण संयत्र अर्थात Tyre Retreading Plant कार्यरत आहे. त्याद्वारे शासकीय उपक्रमांमध्ये वापरली जाणारी 50 टक्के अवजड वाहने आणि प्रवासी वाहने यांच्या टायर्सचे पुन:स्तरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत अवजड आणि प्रवासी शासकीय वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे.

राज्यात मागील वर्षापासून कोरोना व्हायरसचे संकट घोंघावत आहे. संकट अद्यापही कायम असून धोका टाळण्यासाठी लॉकडाऊन, कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचा मोठा फटका परिवहन महामंडळाच्या अर्थचक्राला बसला आहे. हे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कालच्या अपडेटनुसार राज्यात 62,097 नव्या रुग्णांची भर पडली असून 519 जणांचा मृत्यू झाला आहे. 54,224 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसागणित रुग्णसंख्येत पडणारी मोठी भर यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून आजपासून पूर्ण लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे.