गरजेपेक्षा काहीसे लवकरच आटोपावे आणि प्रवासाला निघावे. कारण काय तर, बस वेळेत मिळावी. अनावधानाने उशीर होऊन ती चुकू नये, यासाठीच ही खबरदारी. पण, प्रवाशी म्हणून आपण बस थांब्यावर पोहोचावे आणि बराच काळ ताटकळत उभे राहिले तरीही बस येऊ नये, असे अनेकदा घडते. मूळ स्थानकातूनच उशिरा सुटणाऱ्या आणि उशिरा धावणाऱ्या बसमुळे प्रवासी आणि परीवहन विभागाचे वेळापत्रक नेहमीच कोलमडलेले असते. त्यामुळे मनस्ताप आणि तक्रारी अशा संमिश्र भावनांचा खचच राज्य परिवहन मंडळ (Maharashtra State Transport Board) विभागाकडे पडलेला असतो. या पार्श्वभूमिवर आलेल्या तक्रारींची गंभीर नोंद घेत रापमंने अनोखा निर्णय घेतला आहे. या पुढे खराब रस्त्यांमुळे जर एसटी बस (ST Bus) इच्छित थांब्यावर पोहोचण्यास विलंब लागत असेल तर, तशा सूचना स्थानकांवरील सूचना फलकावर नमूद करण्यात येणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, बस उशीरा धावण्याचे कारण जर एसटी महामंडळाच्या कक्षेतील असेल त्यावर योग्य तो विचार करुन ती समस्या अथवा कारण दूर केले जाईल. मात्र, बसला धावण्यास विलंब होण्यामागे असणारे कारण जर खराब रस्त्ये किंवा इतर कोणते कारण असेल तर त्यासंबंधीची माहिती एका सूचना फलकाद्वारे बस थांब्यांवर लावली जाणार आहे. (हेही वाचा, MSRTC Mega Bharti 2019: ST मध्ये 4416 पदांसाठी भरती; जाणून घ्या कसा आणि कुठे कराल अर्ज?)
उशिरा सुटणाऱ्या एसटी बस फेऱ्यांबाबतीत प्रवाशांकडून एसटी महामंडळाकडे तक्रारी आल्या आहेत. त्याची दखल घेण्यात आली असून एसटी प्रशासनाच्या कक्षेबाहेरील कारण असल्यास ते सूचना फलकावर लिहिण्यात येणार आहे. यात रस्त्यांची यादीही दिली जाणार आहे. बस उशीरा धावत असल्यामुळे अनेकदा प्रवासांच्या संतापाचा उद्रेक होतो. त्याचा नाहक फटका एसटी महामंडळ आणि महामंडळाच्या मालमत्तेला पोहोचतो. तसेच एसटी महामंडळाचीही प्रतिमा मलीन होते. यावर तोडगा म्हणून एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.