Coronavirus in India (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कालच्यापेक्षा आज कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमित रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ झाली आहे. राज्यात आज 3307 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. अशाप्रकारे एकूण संख्या आता 1,16,752 इतकी झाली आहे. आज नवीन 1,315 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत व आतापर्यंत एकूण 59,166 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 51,921 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 114 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण 5651 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यात पुणे व मुंबई येथे सर्वात जास्त कोरोना विषाणूचे रुग्ण आहेत. यामध्येही मुंबईची अवस्था बिकट होत चालली आहे. यामुळेच मुंबईकरांसाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मुंबईमधील रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होण्यासाठी नियोजन केले आहे. आठवडाभरात 650 रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी वॉर्डमधील वॉर रुमशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी नोंदवावी, ही सेवा नागरिकांना विनामूल्य मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पहा एएनआय ट्वीट -

तसेच, मुंबईत आयसीयूचे 500 बेडस् उपलब्ध होणार आहेत, त्यात आठवडाभरत अजून 100 ते 150 बेडस्‌ची भर पडणार आहे. सेंट जॉर्जेस, बीकेसी, सेव्हन हिल, वरळी डोम, येथे बेडस् वाढविणे सुरु झाले आहे. सोबतच कांदिवलीतील राज्य कामगार विमा रुग्णालयात 250 बेडस् वाढविण्यात येणार आहेत. दरम्यान, कोरोना विषाणू चाचणीबाबत सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा: COVID19: कोरोनाचा अहवाल रुग्णांना दिला जाणार नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे)

आता, खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने 2200 व 2800 रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून 2800 रुपये न आकारता त्यांच्याकडून 2500 रुपये घेतले जाणार आहेत. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला असता, त्यासाठी 2200 रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर, त्यासाठी 2500 रुपये आकारायचे असा निर्णय झाला आहे.