Rajesh Tope (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) हाहाकार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयातून रुग्णांची लूट केली जात आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोरोनाचा अहवाल रुग्णांना दिला जाणार नाही. कारण, कोणतीही लक्षणे नसलेले व्यक्ती कोरोनाचा अहवाल घेऊन खाजगी रुग्णालयात दाखल होत आहे. खासगी रुग्णालयात गरज नसताना त्यांना ऑक्सिजन आणि आयसीयू दिले जात आहे. ज्यामुळे इतर रुग्णांना खाजगी रुग्णालयात जागा मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे हा निर्णय रुग्णांचा हितासाठीच घेण्यात आला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

राज्यात रेमडेसेवीर आणि टोसीलोझुबामिन या दोन इंजेक्शनला मोठी मागणी आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ही इंजेक्शन्स फायदेशीर आहेत. यामुळे या दोन्ही इंजेक्शनच्या किंमतीत कमी करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. तसेच आणखी 500 व्हेंटीलेटरचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने 2 हजार 200 व 2 हजार 800 रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून 2 हजार 800 रुपये न आकारता त्यांच्याकडून 2 हजार 500 रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे. हे देखील वाचा- मुंबईतील एकूण परिस्थिती पाहता सध्या मला मुंबईत येण्याचं धाडस नाही - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्रात मंगळवारी रात्रीपर्यंत 2 हजार 701 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 13 हजार 445 वर पोहचली आहे. यापैकी 5 हजार 537 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 57 हजार 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे