Union Minister Nitin Gadkari (PC - ANI)

मुंबईतील (Mumbai) एकूण परिस्थिती पाहता सध्या मला मुंबईत येण्याचं धाडस नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 59201 इतकी झाली आहे. परंतु, वेळ नक्की बदलेले, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. कोरोना विरोद्ध लढा देण्यासाठी अनेक भारतीय शास्त्रज्ञ आणि संस्था लस विकसित करण्याचे काम करत असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.

गडकरी आज 'एमएसएमई एंड इन्फ्रास्ट्रक्चर-पेविंग द ग्रोथ पाथ इन पोस्ट-कोविड वर्ल्ड' कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी जगातील सर्व गुंतवणूकदारांसाठी भारत नक्कीच एक चांगला आणि व्यवहार्य पर्याय ठरणार असल्याचं म्हटलं आहे. (हेही वाचा -India-China Tensions in Ladakh: भारतीय लष्कराचा अधिकारी, 2 जवान शहीद; गलवान व्हॅलीमध्ये भारत-चीन सैन्यांत तणाव)

दरम्यान, कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात रोजगाराची क्षमता निर्माण करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचंही यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितलं. मार्चअखेरपर्यंत ग्रामीण भागातील उलाढाल 88,000 कोटी रुपये आहे. दोन वर्षांत ती 5 लाख कोटी रुपये करण्याचे आमचे लक्ष्य आहे. आमचे ध्येय बाजारातील तरलता वाढविणे आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी तसेच एमएसएमई, पायाभूत सुविधा, रस्ते क्षेत्र, नौवहन, बंदरे इ. मध्ये परकीय गुंतवणूक वाढवणे आहे, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

परंतु, भारतात बँकांशी संबंधित, मागणी आणि पुरवठ्यासह, तरलता या महत्त्वाच्या समस्या आहेत. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सर्वात महत्वाची समस्या म्हणजे तरलता. आम्हाला बाजारात तरलता वाढवणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या चाकांची गती वाढवू शकत नाही, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.