Maharashtra Rains Update: मुंबई, ठाणे, उत्तर कोकणासाठी रेड अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

परतीच्या पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून मुळधार पाऊस सुरु आहे. काल रात्री पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसत आहे. कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या दिशेने सरकत असल्याने आजही मुंबई, ठाणे, उत्तर कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोकणासाठी रेड अलर्ट तर रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. तसंच त्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.

दरम्यान, आज सकाळी 7 वाजता मुंबईच्या किनाऱ्यावर ढग दाटून आल्याचे पाहायला मिळाले. अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्याता आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघरसह उत्तर कोकणात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता- IMD)

K S Hosalikar Tweet:

काल रात्री पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह धुवाधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सायन पोलिस स्टेशन आणि किंग्ज सर्कल परिसरात पाणी साचले.

मुंबईच्या मरिन ड्राईव्ह परिसरातही पावसाची दृश्यं.

काल दुपारपासूनच पुणे शहर आणि जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. तर सोसायट्या, घरांमध्ये पाणी शिरले. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज पुण्यातही वर्तवण्यात आला आहे.

पुण्यात पुरजन्य परिस्थिती उद्भवली असून निमगाव केतकी गावातून सुमारे 40 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान, परतीच्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.