Maharashtra Rains: राज्यात 1 जूनपासून पावसामुळे 104 जणांचा मृत्यू; मुंबईसह अनेक ठिकाणी अजूनही मध्यम स्वरूपाचा पाऊस
Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाने (Heavy Rains) चांगलीच हजेरी लावली आहे. मागच्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रविवारी एका अहवालात म्हटले की, 1 जून रोजी पावसाळा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान 104 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 जून ते 16 जुलै दरम्यान हे मृत्यू झाले आहेत. गेल्या 24 तासांत, जळगाव आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा दोन मृत्यूची नोंद झाली आहे.

पूर, वीज कोसळणे, भूस्खलन, झाडे पडणे आणि इमारती कोसळणे यासह इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील दोन गावे अतिवृष्टीमुळे बाधित झाली असून तीन लोक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. मात्र, गेल्या 24 तासांत पुरामुळे राज्यात कोठेही कोणाचेही स्थलांतर झाले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. मुंबई आणि त्याच्या लगतच्या भागांसह राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे, असेही अहवालामध्ये म्हटले आहे.

आठवडाभराच्या मुसळधार पावसानंतर मुंबईसह राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा वेधशाळेत 12.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ वेधशाळेत गेल्या 24 तासांत 23.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 20.1 मिमी पाऊस झाला आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 20 मिमी पाऊस झाला आहे.

पावसाचा जोर वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चिपळूणजवळील परशुराम घाट विभागात दरड कोसळल्याने, या महिन्यात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. राज्यातील गोदावरी आणि इंद्रावती नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत, तर इतर तीन नद्या धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहेत, असे अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा: Mumbai Rain Update: मुंबईत मुसळधार पावसामुळे तुळशी तलाव ओव्हरप्लो)

अहवालानुसार, गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत 10,600 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या टीम्स जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.