Maharashtra Rains: पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज तर राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी
Ratnagiri Rain

राज्यातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रासह (Western Maharashtra) कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नद्या तुडूंब भरुन वाहत असुन अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तरी नद्याकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असुन काही ठिकाणी शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. हवामान विभागाच्या (Weather Forcasting) अंदाजानुसार आज पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात (Konkan) यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

 

विदर्भातील (Vidarbha) विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असुन पुन्हा एकदा पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्यानं विळखा घातला असुन अप्पर वर्धा (Upper Wardha)- लोअर वर्धा (Lower Wardha) या सारख्या मोठ्या धरणांचे  दरवाजे उघडण्यात आले आहे. विदर्भातील भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. शहरी भागात पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र जोरदार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. तर मराठवाड्यासह (Marathwada) उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. (हे ही वाचा:- 75th Independence Day: राज्य सरकारने जाहीर केली स्वातंत्र्यदिनादिवशी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण फडकावणार तिरंगा)

 

मुंबईसह (Mumbai) उपनगरात देखील सकाळ पासून तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबई (South Mumbai), पश्चिम मुंबई (West Mumbai), ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai) या भागात पावसाच्या तुरळक सरी बघायला मिळत आहे. तरी समुद्राला उधाण आलं असल्यानं समुद्र किनारी फिरणाऱ्यांस विशेष सक्ती करण्यात आली आहे. तर हवामान विभागाकडून पुणे (Pune) जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला  आहे. पुण्यात संसतधार पाऊस सुरु आहे. दोन दिवस पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरातदेखील मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri Chinchwad) जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.