मागील काही दिवसांपासून पावसाने राज्यभरात विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सर्वत्र सक्रीय होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. उद्या (रविवार, 19 सप्टेंबर) पासून पुढील 3 दिवस राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे IMD ने सांगितले आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात पावसाचा प्रभाव दिसून येईल.
उद्या रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशा चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सोमवार आणि मंगळवारी काही ठराविक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यानुसार शेतीची कामं करावी, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
K S Hosalikar Tweet:
IMD, ने आज दिलेल्या पूर्वानुमाना व इशाऱ्या नुसार राज्यात १९ सप्टेंबर-रविवार पासून पुढचे ३ दिवस काही ठिकाणी गडगडाटासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असेल.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/0Sy8D1Ng4j
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 17, 2021
दरम्यान, यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी परतीच्या पावसाचे पीक पाण्यात वाहून जातात. पण यंदा लांबणीवर असलेल्या पावसामुळे पिकांची काढणी ही वेळेत करण्यात येणार आहे.
यंदा राज्यात चांगला पाऊस झाला. अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. विविध दुर्घटनांमध्ये जिवीतहानी मोठ्या प्रमाणावर झाली. तर जनजीवन विस्कळीत झाले.