Devendra Fadnavis-Ashwini Vaishnaw | | (Photo: ANI)

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना (Maharashtra Railway Projects 2025) अधिक चालणा मिळणार आहे. ज्यामुळे महाराष्ट्राला काही नवे रेल्वे मार्ग आणि रेल्वे स्थानकांचे नूतनिकरण केले जाणार आहे. उल्लेखनिय असे की, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पायाभूत सेवा प्रकल्पांसाठी 1 लाख 73 हजार रुपयांचे प्रकल्प मंजूर केले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्वीनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबई येथे आज (11 एप्रिल 2025) मुंबई येथे पार पडली. या पत्रकारपरिषदेतच मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून राज्यास दिलेल्या प्रकल्प आणि निधींची माहिती दिली. दरम्यान, याच वेळी बोलताना नव्या रेल्वे प्रकल्पांमुळे राज्यभरात रेल्वेमार्गांचे जाळे विस्तारेल, खास करुन विदर्भास त्याचा अधिक फायदा होईल, शिवाय मुंबईमध्येही नव्या एसी लोकल सेवा सुरु केल्या जातील, असे केंद्रीय रेल्वेमंत्री आश्वीनी वैष्णव यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील नवे रेल्वे प्रकल्प

राज्यातील नव्या रेल्वेमार्गांची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यानुसार राज्यातील नवे रेल्वेमार्ग आणि प्रकल्प खालीलप्रमाणे:

  • गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्ग
  • जळगाव-जालना रेल्वेमार्ग
  • कल्याण-आसनगाव (चौथ्या मार्गिकेचे काम)
  • मुंबईमध्ये एसी लोकल ट्रेनची संख्या वाढवणार

'राज्याला 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी'

अधिक माहिती देताना आश्विनी वैष्णव म्हणाले, पंतप्रधानांनी अलीकडेच महाराष्ट्रातील 240 किमी लांबीच्या गोंदिया-बल्हारशाह रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला 4,819 कोटी रुपये खर्चून मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प उत्तर आणि दक्षिण भारतामधील प्रवासी आणि मालवाहतूक जोडणी वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या प्रदेशातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांचा जलद विकास होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्राला रेल्वे पायाभूत सुविधांसाठी अभूतपूर्व पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्राला 1.73 लाख कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प देण्यात आले आहेत, ज्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षातच राज्याला 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी आणि कट रचणाऱ्यांपैकी एक तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आल्याने मला खूप आनंद झाला आहे. भारतीय न्यायव्यवस्थेला सामोरे जाण्यासाठी कट रचणाऱ्याला भारतात आणल्याबद्दल मी मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानतो. कायद्यानुसार कसाबला फाशी देण्यात आली हे आमच्यावर ओझे होते, परंतु कट रचणारा आमच्या ताब्यात नव्हता. तो आता एनआयएकडे आहे आणि ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आता, एनआयए तपास आणि कायदेशीर प्रक्रियांबद्दल विचार करेल. आम्हाला जी काही माहिती हवी असेल ती आम्ही एनआयएकडून घेऊ आणि जर त्यांना काही मदत हवी असेल तर आम्ही ती मुंबई पोलिसांमार्फत करू.