शिवसेना (Shiv Sena) आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्यानंतर आता राजधानी दिल्लीतही त्याचे पडसाद उमटत आहे. आमदारांपाठोपाठ आता खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. शिवसेनेच्या 12 खासदारांनी गट स्थापन केला असून, त्याला संसदेत मान्यता मिळविण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. त्याबाबत एक पत्रही लोकसभा अध्यक्षांना लिहिण्यात आले आहे. मात्र, या पत्रात लोकसभा सचिवालयाने बदल सुचवले आहेत. त्यामुळे हे बदल करुनच नवे पत्र शिंदे गटाला सादर करावे लागणार आहे. सचिवालयाने सूचवलेल्या बदलांमुळे शिंदेगटाच्या दिल्लीतील वर्चस्वाच्या लढाईला काहीसा ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे.
शिंदे गटाकडून सचिवालयाने केलेले बदल स्वीकारत नवे पत्र आज सांयकाळ किंवा उद्यापर्यंत सादर केले जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या या हालचालींमुळे एकनाथ शिंदे यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच बाजूला सारुन पक्षच ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीनेच राजधानी दिल्लीत हालचाली घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Sanjay Raut On CM: अमित शहांचा दबाव आमच्यावरही होता, मात्र आम्ही घाबरलो नाही, संजय राऊतांचे विधान)
दरम्यान, शिंदे गटातील काही खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांच्या दालनात जाऊन भेटले. या भेटीत लोकसभेचे नियम आणि खासदारांची एकूण संख्या यावर विचार करण्यात आले. शिंदे गटाने या वेळी दिलेल्या पत्रात लोकसभा सचिवालयाने शिंदे गटाने दिलेल्या पत्रात काही बदल सूचवले. ते बदल करुन हे पत्र दिले जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने आपले पत्र हे मुख्य प्रतोदांच्या नावे स्वाक्षरीसह द्यावे, असे सचिवालयाकडून सांगण्यात आले.
शिंदे गटासमोरील पेच असा की, लोकसभेतील गटनेते विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूचे आहेत. त्यामुळे आता विनायक राऊत यांना हटवून त्या जागी राहुल शेवाळे यांची निवड करण्याच्या दृष्टीने शिंदे गटाच्या हालचाली सुरु आहेत. तर, भावना गवळी या मुख्य प्रतोद आहेत. त्यांनाच पुढेही कायम ठेवण्याचा शिंदे गटाचा विचार आहे. यातही एक पेच असा आहे की, शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र गेले आहे की, भावना गवळी यांना मुख्य प्रतोद पदावरुन हटवण्यात आले असून, त्या जागी राजन विचारे यांची निवड पक्षाने केली आहे. लोकसभा सचिवालयाने राजन विचारे यांच्या नावाचा प्रतोद म्हणून विचार करावा. इतर कोणत्याही गटाकडून प्रतोद म्हणून आलेल्या नावावर विचार करु नये.
दरम्यान, शिवसेनेच्या एकूण 18 खासदारांपैकी विनायक राऊत, अरविंद सावंत ,राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार तूर्तास सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. उर्वरीत 12 खासदार हे शिंदे गटात असल्याची माहिती आहे.