राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने नेहमीच 42 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. मात्र, आतापर्यंत 41 आमदारांचीच नावे समोर येत होती. हा 42 वा आमदार नक्की कोण? याची उत्सुकता ताणली गेली होती. नवाब मलिक हे तटस्थ असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या यादीत अजित पवार गटाला पाठिंबा देणारे 42 वे आमदार हे दुसरे तिसरे कोणी नसून मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले नवाब मलिक असल्याचे समोर आले आहे.
फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे. मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना भाजपविरोधात हल्लाबोल केला होता. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात ते तुरुंगात गेले. जेव्हा तब्येतीच्या कारणास्तव त्यांना सोडण्यात आले, तेव्हा त्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्टपणे कळू शकली नव्हती. आता निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेल्या समर्थकांच्या यादीत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
फरार डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत कथित व्यवहार केल्याप्रकरणी मलिक यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटला तेव्हा ते तुरुंगात होते. त्यांच्या सुटकेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच प्रयत्न केले आणि त्यामुळे ते अजित पवार गटाची बाजू घेतील असा अंदाज वर्तवला जात होता. हा अंदाज खरा ठरला आहे. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या यादीतून या अटकळांना पुष्टी मिळाली आहे. नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला आपला पाठींबा दिला आहे. (हेही वाचा: Maharashtra Hospital Deaths: ठाणे, नांदेड, संभाजीनगर, नागपूर मधील शासकीय हॉस्पिटलमध्ये जीव गेलेल्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका करत चौकशीची मागणी)
नवाब मलिकही अजित पवारांच्या गटामध्ये सामील होणार का? असा प्रश्न शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांणा विचारला असता, पाटील म्हणाले-‘न्यायालयाने नवाब मलिक यांना बाहेर काहीही बोलण्यापासून रोखले आहे, त्यामुळे त्यांनी असे कुठेही म्हटले नाही. नवाब मलिक अजित पवार यांच्या गटासोबत जात असल्याचं मी मीडियातून ऐकलं आहे.’ दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे चिन्ह नेमके कोणाचे याबाबत निवडणूक आयोगासमोर कालपासून सुनावणी सुरु झाली आहे. येत्या सोमवारपासून ही सुनावणी पुन्हा सुरु होईल.