Ajit Pawar | Twitter

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मध्ये पुन्हा राजकीय भूकंप होण्याच्या शक्यता आहे. शरद पवार यांचे पुतणे, विरोधीपक्ष नेते अजित पवार आज राजभवनावर दाखल झाले आहेत. काल अजित पवार यांनि पूर्वनियोजित कार्यक्रमाला गैर हजेरी लावली होती तेव्हापासून अजित पवारांच्या नाराजी बद्दल कुणकुण आहे. अडीज वर्षांपूर्वी अशाच प्रकारे अजित पवार यांनी अचानक काही आमदारांच्या पत्राच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

राजभवनावर एनसीपीचे काही आमदार, नेते दाखल झाले आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री सोबतच गृहमंत्री पदाचा कारभार आहे. आता राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. आज सकाळी अजित पवार यांच्या देवगिरी वर एनसीपी नेते दाखल होते. त्यावेळी ही पक्षांतर्गत बैठक असल्याचं सांगितलं जात होतं. त्याला सुप्रिया सुळेंचीही साथ होती. त्यानंतर 6 जुलैच्या बैठकीत अजित पवारांच्या नाराजीबद्दल आढावा घेतला जाईल असं म्हटलं होतं. पण आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सुप्रिया सुळे यांना काही दिवसांपूर्वी एनसीपीच्या राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी देण्यात आली होती. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत त्यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर अजितपवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हवी होती. त्यावरून त्यांनी 1 जुलै पर्यंत अल्टिमेटम देण्यात आली होती. ही वेळ उलटली आणि अखेर अजित पवार यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं पहायला मिळालं आहे.

महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्रिमंडळ विस्तार प्रलंबित होता. त्यापार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केलेलं हे बंड चर्चेचा विषय आहे. भाजपा सोबत याप्रमाणेच वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार बाहेर पडले होते. आता त्याच्यापाठोपाठ एनसीपी मध्येही बंड झाले आहे.