शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस धाडण्यात आल्याने आता हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. याविरूद्ध बंडाखोर आमदारांकडून 2 स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी आहे. नक्की वाचा: एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांची फोन वरून 2 वेळेस चर्चा; मनसे नेत्याचा दुजोरा .
शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याचं कारण देत एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसीला उत्तर देण्यासाठी 2 दिवसांचा अवधी दिला आहे. आज (27 जून) सोमवारी सायंकाळपर्यंत त्याला उत्तर द्यायचे आहे. मात्र, शिंदे गटाच्या वतीने या नोटिसींनाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. तसेच नवे गटनेते नियुक्त करण्याच्या निर्णयालाही आव्हान देण्यात आले आह़े. शिंदे गटाच्या दाव्यानुसार हा वेळ 7 दिवसांचा अपेक्षित आहे. तसेच गैरहजेरीवरून अपात्रतेची कारवाई ही पक्षाच्या बैठकीला नव्हे तर विधिमंडळाच्या कामासाठी होऊ शकते असा दावा केला जात आहे.
दरम्यान शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हाकलपट्टी करून त्याजागी अजय चौधरींची नेमणूक करण्यात आली आहे. तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांना कायम ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ एकनाथ शिंदे गटाकडे असल्याने त्यांच्या गटाचा नेता विधिमंडळात गटनेता असावा अशी त्यांची मागणी आहे. बंडखोरांकडून भरत गोगावले यांना प्रतोद करण्यात आले आहे.
शिवसेनेकडून कायदेशीर कारवाई करत बंड मोडून काढण्याचं काम सुरू असताना गुवाहाटीत गेलेले 15-16 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असून मुंबईत परत आल्यानंतर ते शिवसेनेच्या बाजूने असतील असा विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडी मजबूत असल्याचं शिवसेनेकडून सांगितलं जात आहे.