महाराष्ट्र महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक निकाल 2019: इथे पाहा सर्व विजयी उमेदवारांची यादी पक्षाच्या नावासह
politics | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (सोमवार, 24 जून 2019 रोजी पार पडली. अर्थात पोटनिवडणूका लागलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची संख्या अधिक नसली तरी, आगामी विधानसभा निवडणूक 2019 साठीची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुका ओळखल्या जातात. या पार्श्वभूमिवर या निवडणुकांना महत्त्व प्राप्त होते. या निवडणुकांच्या निकालावर नजर टाकता संमिश्र निकाल हाती येतो. इथे जाणून घ्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक निकाल 2019 मधील  सर्व विजयी उमेदवारांची यादी पक्षाच्या नावासह.

पुणे महापालिका पोटनिवडणूक निकाल 2019

पुणे महापालिका पोटनिवडणूक 2019: पुणे महापालिकेसाठी झालेल्या प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये 7, प्रभाग क्रमांक 42 अ मध्ये 4 आणि ब मध्ये 3 या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणूकीचा निकाल हाती आला आहे. या निकालानुसार प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपच्या ऐश्वर्या जाथव यांनी बाजी मारली. त्यांना तीन हजारांहून अधिक मते मिळाली. भाजप नगरसेवक किरण जठार यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने या प्रभागात पोटनिवडणूक झाली.

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक 42 लोहगाव-फुरसुंगी येथे एकूण दोन जांसाठी निवडणूक पारपडली. या दोन जागांपैकी एका ठिकाणी प्रत्येकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस, आणि भाजप विजयी झाले. प्रभाग क्रमांक 42 (अ) मधून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर प्रभाग क्रमांक 42 (ब) मधून भाजपच्या अश्विनी पोकळे विजयी झाल्या. दोन्ही उमेदवारांना अनुक्रमे चार हजार आणि 942 इतके मताधिक्य मिळाले.

इंदापूर बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल 2019

दरम्यान, पुण्यात इंदापूर बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी बहुमताने बाजी मारली. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवरुन अंकिता पाटिल यांना 17 हजार 274 मतांनी विजय प्राप्त झाला. या जागेसाठी 23 जून रोजी मतदान पार पडले होते.

चंद्रपूर महापालिका आणि मूल नगरपरिषद पोटनिवडणूक 2019

चंद्रपूर महापालिका आणि मूल नगरपरिषदेसाठी झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपला काहीसा धक्का तर काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक कही खूशी कही गम अशी पाहायला मिळाली. प्रामुख्याने चंद्रपूर महापालिकेसाठी दोन जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. यात एका ठिकाणी काँग्रेस तर एका ठिकाणी भाजप विजयी ठरली. दोन्ही जागांसाठी 23 जून 2019 रोजी मतदान पार पडले होते. प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर महापालिकेत प्रभाग क्रं. 6 मध्ये काँग्रेसच्या कलावती यादव विजयी ठरल्याच तर प्रभाग क्र. 13 मध्ये भाजपचे प्रदीप किरमे विजयी ठरले. अर्थात चंद्रपूर महापालिकेत आगोदरपासून भाजपचीच सत्ता आहे. पोटनिवडणुकीत आता एका जागेची वाढ झाली इतकेच.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या मूल नगरपरिषद पोटनिवडणूकीत मात्र भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 6 साठी झालेल्या पोटनिवडणूकीसाठी भाजप (BJP) उमेदवार शिल्पा रामटेके यांचा पराभव झाला. तर काँग्रेस (Congress) उमेदवार ललिता फुलझेले (Lalitha Fulzele) यांचा विजय झाला. ललिता फुलझेले यांनी शिल्पा रामटेके यांचा 176 मतांनी पराभव केला.

अहमदनगर नगरपरिषद, संगमनेर नगरपालिका पोटनिवडणूक निकाल 2019

अहमदनगर नगरपरिषद आणि संगमनेर नगरपालिका पोटनिवडणूकीत काँग्रेस उमेदवार विजयी झाले. शिवसेना नगरसेवकाचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने इथे पोटनिवडणूक लागली होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर झालेली ही पहिलिची निवडणुक होती. त्यामुळे काँग्रेस नेते बाळासाहेब धोरात यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली होती. इछे काँग्रेसचे राजेंद्र वाकचौरे 711 मतांनी विजयी झाले.

मालेगाव महापालिका पोटनिवडणूक निकाल 2019

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. 6 क साठी पोटनिवडणूक पार पडली. यात काँग्रेस उमेदवार विजयी झाला. इथे काँग्रेसच्या पहमिदा कीरदौस मो.पारुक आणि जनता दलाच्या खान शकीला बेगम अमानुतुल्ल्ला यांच्यात लढत होती. हा प्रभाग महिलांसाठी राखीव होता.

जळगाव पंचायत समिती, ग्रामपंचायत पोटनिवडणूक निकाल 2019

जळगाव मध्येही पंचायत समिती, ग्रांमपंचायतीसाठी पोटनिवडणूक पार पडली. मेहुणबारे पंचायत समिती गण पोटनिवडणूकीत भाजपच्या सुनंदा साळुंखे विजयी झाल्या. साळुंखे सुनंदा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री साळुंखे यांना पराभूत केले. भाजप सदस्या जयश्री साळुंखे यांच्या अकाली निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.  (हेही वाचा, विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांची वर्णी)

दरम्यान, हिंगोणे ग्रामपंचात प्रभाग क्रमांक 3 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रमिलाबाई सुरेश पाटील या विजयी झाल्या. त्यांनी सुनील कोष्टी यांचा सहा मतांनी निसटता पराभव केला. प्रमिलाबाई यांना 133 तर सुनील कोष्टी यांना 127 मतं मिळाली. (हेही वाचा, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मला आक्रमकता मिळाली; नवनिर्वाचीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पहिल्याच भाषणात विरोधकांचे कौतुक)

परभणी महापालिका पोटनिवडणूक निकाल 2019

प्रभाग क्रमांक 3 मध्ये झालेल्या पोटनिवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गवळणबाई रोडे विजयी झाल्या. नगरसेवक अमरदीप रोडे यांचे निधन झाल्याने यथे पोटनिवडणूक लागली होती. प्रभाग क्र 11 मध्ये एमआयएमच्या अब्दुल फातेमा अब्दुल जावेद विजयी झाल्या. या प्रभागात काँग्रेसचे नईमोद्दीन यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने पोटनिवडणूक लागली होती.