Vijay Wadettiwar and Balasaheb Thackeray | (Photo credit: archived, edited, symbolic images)

विधानसभेतील नवनिर्वाचीत विरोधी पक्षनेते (Maharashtra Legislative Assembly Leader of Opposition) म्हणून निवड झाल्यानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सभागृहातील आपल्या पहिल्याच भाषणात शिवसेना पक्षप्रुमख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासह माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले. या निमित्ताने वडेट्टीवार यांनी विनोद, मुत्सद्दीपणा आणि राजकीय भूमिकांचे व्यप्त स्वरुप असे विविध पैलू वडेट्टीवार यांनी पहिल्याच भाषणात दाखवले.

या वेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, गेली अनेक वर्षे मी आमदार म्हणून काम करतो आहे. चंद्रपूरसारख्या अत्यंत दूर्गम आणि आदिवासी भागात काम करणारा एक आक्रमक कार्यकर्ता अशी माझी ओळख. पण, आज जरी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेता म्हणून माझी निवड झाली असली तरी एक गोष्ट मला प्रांजळपणे मान्य करावीच लागेल. ती म्हणजे माझ्यात आलेली आक्रमकता ही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आली आहे, असे कौतुकोद्गार विधानसभेतील नवनिर्वाचीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काढले.  (हेही वाचा, विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांची वर्णी)

दरम्यान, साडेचार वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेशकर्ते झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल राग, उद्गेवही अप्रत्यक्षरित्या वडेट्टीवार यांच्या भाषणातून व्यक्त होताना दिसला. सभागृहात बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी वडेट्टीवार यांच्याकडे पाहत आपण आता इकडच्या बाजूला (सत्ताधारी) या असे गंमतीने म्हटले. यावर आपल्या भाषणात वडेट्टीवार यांनी उत्तर दिले की, सुधीरभाऊ इकडून (विरोधी पक्षातून) तिकडे अशा पद्धतीने येणे हे वारंवार घडत नसते. हे खरे आहे की लोकशाहीत सर्वांना स्वातंत्र्य आहे. पण, प्रत्येकाच्या राजकीय भूमिका ठरलेल्या आहेत. त्यामुळे हे प्रत्येक वेळीच शक्य होतं असं नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांच्या भाषणात राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशा पद्धतीने काँग्रेस सोडल्याची सलही होती.