राज्यातील खासदारांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेत उल्लेखनिय कामगिरी केली आहे. लोकसभा सभागृहात प्रश्न विचारण्यात महाराष्ट्राचे खासदार (Maharashtra MPs Performance in Lok Sabha) अव्वल राहिले आहेत. त्यातही खासदारांच्या कामगिरीचा पक्षनिहाय विचार करता भाजपच्या खासदारांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत तर त्या खालोखाल शिवसेना खासदार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena) खासदारांचे लोकसभेत प्रश्न विचारण्याचे प्रमाण अनुक्रमे 45%, 37% इतके आहे. लोकसभेत एकूण विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या तुलनेत महाराष्ट्रातील खासदारांचे प्रश्न विचारण्याचे प्रमाण 29% आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत. तर भाजपचे सोलापूरचे खासदार खासदार डॉ. जयसिद्धेश्वार महास्वामी यांनी सर्वात कमी प्रश्न विचारले आहेत.
महाराष्ट्रातील खासदारांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांबाबतचे एक प्रकती पुस्तक 'संपर्क' नावाच्या संस्थेने तयार केले आहे. या पुस्तकात खासदारांच्या लोकसभेतील कामगिरीचा उहापोह करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक 2019 पासून 2021 पर्यंत संसदेची एकूण पाच अधिवेशने झाली. त्यात कोरोना व्हायरस महामारीमुळे लोकसभेच्या कामकाजावर बऱ्याच मर्यादा आल्या. कामकाजावरही परिणाम झाला. तरीही जेवढी अधिवेशने झाली आणि कामकाज झाले त्यात आतापर्यंत 23,979 प्रश्न विचारण्यात आले. त्यातील 6,944 प्रश्न हे महाराष्ट्रातील खासदारांनी विचारले आहेत. महाराष्ट्रातील 48 पैकी सात महिला खासदार आहेत. उर्वरीत पुरुष खासदार आहेत. महिला खासदारांनी 998 प्रश्न विचारले आहेत. (हेही वाचा, खासदारांचे प्रगतीपुस्तक; शिवसेनेचे अरविंद सावंत ठरले अव्वल, तर उदयनराजे शेवटून पहिले)
सर्वाधिक प्रश्न विचारणारे पहिले पाच खासदार
- सुप्रिया सुळे (बारामती- राष्ट्रवादी) –313
- डॉ. सुभाष भामरे (धुळे- भाजप) – 306
- डॉ. अमोल कोल्हे (शिरुर- राष्ट्रवादी) – 306
- श्रीरंग बारणे (मावळ- शिवसेना) – 298
- गजानन कीर्तीकर (उत्तर पश्चिम मुंबई – शिवसेना) – 290
महिलांची खासदारांची कामगिरी
- सुप्रिया सुळे – 313
- डॉ. हिना गावित – 240
- प्रीतम मुंडे –157
- पूनम महाजन – 130
- भारती पवार – 109
- नवनीत राणा – 28
- भावना गवळी – 21
सर्वात कमी प्रश्न विचारणारे खासदार
- डॉ. जयसिद्देश्वार महास्वामी (सोलापूर – भाजप) – 20
- डॉ.भावना गवळी (यवतमाळ- शिवसेना) – 21
- नवनीत राणा (अमरावती – अपक्ष ) – 28
- सुनील मेंढे (भंडारा-गोंदिया- भाजप) – 66
खासदारांची कामगिरी (पक्षनिहाय)
- भाजप –24 खासदार – प्रश्नसंख्या – 3116 (45%)
- शिवसेना – 17 खासदार – प्रश्नसंख्या – 2539 (37%)
- राष्ट्रवादी काँग्रेस – 4 खासदार –959 (14% )
- काँग्रेस, एमआयएम,अपक्ष खासदार – प्रत्येकी 2% प्रश्न
एकेकाळी महाराष्ट्रीतील खासदारांना मौनी खासदार म्हटले जात असे. महाराष्ट्रातील खासदारांचे प्रश्न विचारण्याचे प्रमाण अगदीच अत्यल्प होते. पण, आता परिस्थिती सुधारत आहे. महाराष्ट्रातील खासदारांची संसदेतील कामगिरी उल्लेखनिय ठरत आहे. बदलत्या महाराष्ट्रासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब म्हटली पाहिजे.