Maharashtra Monsoon 2022: पावसाळ्यातील तक्रारींसाठी MSRDC आणि MMRDA ने जारी केले हेल्पलाइन क्रमांक; 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत 24x7 असणार कार्यरत
Monsoon | File Photo

अवघ्या काही दिवसांवर मॉन्सून (Monsoon 2022) येऊन ठेपला आहे. दरवर्षी राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी पूरस्थिती (Flood) निर्माण होते. या दरम्यान जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभुमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांसारख्या राज्याच्या नेतृत्वाखालील पायाभूत सुविधा विकास संस्थांनी, पावसाळ्याशी संबंधित तक्रारींसाठी समर्पित हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत. MSRDC आणि MMRDA जनसंपर्क कार्यालयाने 1 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत 24x7 कार्यरत असणारे क्रमांक जाहीर केले आहेत.

MSRDC हेल्पलाइन क्रमांक 022-26517935/26420914 आणि 8928128406 आहेत. MMRDA ने मान्सून हेल्पलाइन क्रमांकासाठी 24x7 नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत, ज्यांचे नंबर 022-26591241, 022-26594176, 8657402090 आणि 1800228801 आहेत. MMRDA ने सांगितले की, हे नियंत्रण कक्ष नागरिकांच्या तक्रारींवर चोवीस तास फॉलोअप कारवाई करतील आणि MCGM, PWD, MSRDC अशा अनेक आपत्ती नियंत्रण संस्थांशी संवाद साधतील.

प्राधिकरणाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या ठिकाणी वाहनांची आणि पादचाऱ्यांची होणारी गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने हे उपयुक्त ठरेल. झाडे उन्मळून पडणे, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी, खड्डे अशा विविध बाबींसाठी लोक नियंत्रण कक्षाची मदत घेऊ शकतील. एमएमआरडीएनुसार नियंत्रण कक्षाचे कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतील. (हेही वाचा: कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या 17 हजार लोकांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकार देणार 50 हजारांची मदत)

याबाबत MMRDA चे संयुक्त महानगर आयुक्त राहुल कर्डिले म्हणाले की, ‘कंत्राटदारांना सुरक्षेच्या उपायांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच त्यांना बॅरिकेडिंग, खराब झालेल्या रस्त्यांची कामे पुनर्संचयित करणे, रस्त्यांवरील चिखल साफ करणे अशा जबाबदाऱ्यादेखील दिल्या आहेत. यासोबतच कंत्राटदार पाणी साचण्याच्या ठिकाणी किंवा जेथे पावसाच्या पाण्याची नाल्यांशी कनेक्टिव्हिटी नाही अशा ठिकाणी पुरेशा क्षमतेचे डिवॉटरिंग पंप देखील ठेवतील.’