मुंबई सह उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बसरत होता. आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी लवकरच पावसाचे कमबॅक मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. रविवार (2 ऑगस्ट) पासून पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह कोकणात रविवार पासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल आणि 4-5 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच पुढील 24 तासांतही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकण या भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. ही माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
काल सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची रिपरिप सुरु होती. पावसाचा जोर पुढील 24 तास कायम राहणार असा अंदाज होता. तर आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे मुंबईकरांसह राज्यातील नागरिक सुखावले आहेत.
K S Hosalikar Tweet:
As per IMD GFS guidance there could be enhancement of rains over west coast from today onwards from S Konkan
N Konkan including Mumbai, Thane NM likely to get hvy rains from Sunday. 4-5 Aug trend likely to continue with further increase.
Nxt 24 hrs that areas hvy falls likely.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 31, 2020
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं. त्यानंतर जुलै महिन्यात दमदार पाऊस राज्यातील नागरिकांना अनुभवायला मिळाला. आता ऑगस्ट महिन्यात पाऊसचा जोर कितपत राहतो, येत्या काळात स्पष्ट होईल. दरम्यान ऑगस्टच्या सुरुवातीच्या दिवसात तरी जोरदार पाऊस बरसेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.