19 फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालयात राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य; उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
Maharashtra minister Uday Samant (PC - ANI)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून म्हणजे 19 फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत (National Anthem) म्हणणे अनिवार्य असणार आहे. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पुण्यात यासंदर्भात घोषणा केली आहे.

उदय सामंत आज विविध कार्यक्रमांसाठी पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सध्या राज्यात इंजिनिअरिंगच्या 50 ते 52 टक्के जागा भरल्या जात नाहीत. त्या भराव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. तसेच कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी मुलांमध्ये प्रबोधन व्हावं, यासाठी लवकरचं जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. तसेच महाविद्यालयाच मुलींची छेडछाड होणार नाही, यासाठी काळजी घेतली जाईल, असेही सामंत यावेळी म्हणाले. (वाचा - महाराष्ट्र राज्य सरकार कर्मचार्‍यांसाठी 29 फेब्रुवारीपासून होणार 5 दिवसांचा आठवडा; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय)

मुलींच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून प्रत्येक महाविद्यालयातील शिक्षक, प्राचार्य यांच्या मदतीने विविध शिबिरांचे आयोजन केले जाईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले. भारतासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती निर्माण व्हावी, यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीतानेच झाली पाहिजे, असे मतही सामंत यांनी यावेळी व्यक्त केले.