CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

ठाकरे सरकारने (Thackeray Government) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना चांगली बातमी दिली आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 5 दिवसांचा आठवडा करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांकडून होत आहे. या मागणीला आता ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यानुसार येत्या 29 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी बैठक घेतली होती. या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. दररोज कामाची 45 मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय करता येईल, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा - खुशखबर! दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई मेट्रो सुरु करणार 'ट्रॅव्हल हेल्पडेस्क' जेथे पाल्यासह पालकांना मिळणार 'ही' विशेष सुविधा)

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली आणि या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, आता शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना आठवड्यात 5 दिवसचं काम करावं लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महिना अखेरीस म्हणजेच 29 फेब्रवारीपासून करण्यात येणार आहे.