
महाराष्ट्रातील रायगड (Raigad) जिल्ह्यातील इर्शालवाडी (Irshalwadi) गावात भूस्खलनानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि इतर यंत्रणांनी रविवारी चौथ्या दिवशी शोध आणि बचाव कार्य पुन्हा सुरू केले. या भूस्खलनात 27 जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी शोध आणि बचाव कार्य पुन्हा सुरू झाल्यानंतर अद्यापपर्यंत एकही मृतदेह सापडलेला नाही. मुंबईपासून (Mumbai) सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील डोंगरावर वसलेल्या आदिवासी गावात बुधवारी रात्री दरड कोसळली. (हेही वाचा - Irshalwadi Landslide: मृतांची संख्या 22 वर , NDRF ची शोधमोहीम सुरुच)
अधिकाऱ्यांनी सांगितले की, गावातील 48 पैकी किमान 17 घरे ढिगाऱ्याखाली पूर्णपणे किंवा अंशत: गाडली गेली आहेत. तत्पूर्वी, अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, शनिवारी झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या 27 वर पोहोचली आहे, तर 81 लोकांचा अद्याप शोध लागलेला नाही. शनिवारी रात्री अंधार आणि खराब हवामानामुळे शोध आणि बचाव कार्य मागे घेण्यात आले. रविवारी सकाळी ते पुन्हा सुरू करण्यात आले.
रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मशिन्सचा वापर केला जात नाही, कारण माती खोदण्याचे उपकरण गावात नेणे सोपे नाही कारण त्याकडे जाणारा रस्ता नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत सापडलेल्या 27 मृतदेहांपैकी 12 मृतदेह महिला, 10 पुरुष आणि चार लहान मुलांचे आहेत, तर एका व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
मृतांना आर्थिक मदत, जखमांवर सरकारी खर्चाने उपचार
राज्य सरकारने ईर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये तर जखमींवर शासकीय खर्चांमध्ये उपचार केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. भूस्खलनाच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली. शाह म्हणाले की बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या चार पथके तैनात करण्यात आली आहेत.