
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) कडून यंदा 12वीच्या परीक्षेला (HSC Exam) बसणार्या मुलांना परीक्षेसाठी अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थी नियमित शुल्कासह अर्ज करू शकणार आहेत तर 15 ते 22 नोव्हेंबर पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत आहे. असे जाहीर करण्यात आले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने तर व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज कॉलेज कडून भरले जाणार आहेत.
बारावीचे अर्ज भरण्यासाठी 30 ऑक्टोबर पर्यंत मुदत होती पण त्याला मुदतवाढ देऊन ती आता 22 नोव्हेंबर पर्यंत करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळा, कॉलेज कडून चलनासोबत विद्यार्थ्यांच्या याद्या दिल्या जातील. त्यानंतर 27 नोव्हेंबर पर्यंत प्री लिस्ट दाखल केली जाणार आहे.
दरम्यान खासगी विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ आहे. विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काद्वारे अर्ज भरण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये 20 रुपये प्रति दिन या दराने अतिविलंब शुल्क भरावे लागणार आहे. शिक्षणाच्या बाहेर राहिलेल्या, पण किमान पाचवी पास असलेल्या विद्यार्थ्यांना खासगीरित्या दहावी-बारावीची परीक्षा देण्याची सुविधा आहे.
यंदा बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार संभाव्य वेळापत्रकात बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात होणार आहे. असे सांगितले आहे. बोर्डाकडून परीक्षांच्या अंतिम तारखा आणि वेळापत्रक जाहीर केलेले नाही.