महाराष्ट्र विधानसभा (Photo Credit : Youtube)

Maharashtra Vidhan Sabha Floor Test: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपालांसमोर शपथ घेऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा दावा केला. परंतु राज्यपालांनी घेतलेला हा निर्णय योग्य की अयोग्य यावर न्यायालयाने मात्र कोणताही निर्णय देण्यास नकार देत राज्यपालांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप केला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हंगामी अध्यक्षांची निवड केल्यानंतर त्यांनी लगेचच फ्लोर टेस्ट घेणं अपेक्षित आहे. त्यानुसार आता लवकरच हंगामी अध्यक्ष कोण होणार याचा निकाल जाहीर करण्यात येईल. राज्यपाल हंगामी अध्यक्षाची निवड करणार आहेत.

हंगामी अध्यक्ष कसा निवडला जातो?

कोणत्या पक्षाकडे संख्याबळ जास्त आहे त्यावर हंगामी अध्यक्ष कोण होणार याचा निर्णय अवलंबून नसतो. किंबहुना, ज्या सदस्याने सभागृहात जास्त काळ काम केले आहे त्यालाच राज्यपाल हंगामी अध्यक्ष करतात. या नियमानुसार बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात जास्त काळ काम केले आहे. त्यामुळे त्यांची हंगामी अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. परंतु ही निवड राज्यपाल करणार असल्याने ते कोणाला निवडतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

Maharashtra Government Formation: व्हीप म्हणजे नक्की काय? व्हीप काढण्याचा कोणाला असतो अधिकार?

हंगामी अध्यक्ष कशी घेणार फ्लोर टेस्ट?

हंगामी अध्यक्ष फ्लोर टेस्टसाठी आवाजी मतदान घेऊ शकतात. गेल्यावेळी देखील आवाजी मतदान घेण्यात आलं होतं. परंतु तांत्रिक दृष्ट्या ते अडचणीचं असतं. त्यामुळे यावेळी कसं मतदान घेण्यात येणार हे देखील बघणं महत्त्वाचं ठरेल. त्याचसोबत हंगामी अध्यक्षाला कोणत्याही पक्षाचा गटनेता निवडीसंदर्भात फारसे अधिकार नसतात.