Maharashtra Floods: मुंबईतील सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याची भाजपची घोषणा
BJP | (File Image)

राज्यात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदत करत असतानाच भाजपने (BJP) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई (Mumbai) मधील भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे. यासंदर्भातील पत्र भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका चिटणीसांना दिले आहे. राज्यात कुठेही आपत्तीजन्य परिस्थिती उद्बवल्यास भाजपच्या वतीने तातडीची मदत नेहमीच करण्यात येते. आताही भाजप नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त निधीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. (Mahad, Raigad Landslide: तळीये गावातील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं मिळणार- नारायण राणे)

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून दुर्गघटना घडल्या. यात अनेक नागरिकांचा बळी गेला असून कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे यांचे पुर्नवसन करण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. राज्य आणि केंद्राकडून मदत होत आहे. परंतु, त्यापलिकडेही मदतीची गरज आहे. अशावेळी भाजपकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण पूरपरिस्थितीची आढावा घेण्यासाठी पाहाणी दौऱ्यावर होते. त्यावेळी व्यापाऱ्यांसोहत चर्चा सुरु असताना एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर रडत आपली व्यथा मांडली. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होत्याचं नव्हतं झालं. सर्व गेलं. तुम्हीही काहीही करा पण आम्हाला मदत करा. आमदार, खासदारांचा दोन महिन्यांचा पगार फिरवा पण आमची मदत करा, असे ती महिला रडत सांगत होती. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत होता. दरम्यान, भाजपच्या या निर्णयानंतर या घटनेची गंभीर दखल पक्षाने घेतली असावी, असे दिसते.