महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे कोल्हापूर(Kolhapur), सांगली (Sangali), सातारा (Satara) प्रदेशात लाखो लोकांची दैना झाली आहे. उपाशीपोटी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या या नागरिकांना वाचवण्यासाठी बचावकार्य अद्याप सुरु आहे. मात्र जीव वाचला असला तरी खरी समस्या तर यापुढे येणार आहे. पुराच्या पाण्यात लाखो संसार वाहून गेल्याने आता नागरिकांच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची सुद्धा टंचाई जाणवू शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन राज्यात अनेक सामाजिक, राजकीय संस्थांनी मदतकार्य आरंभले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP Chief) शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुद्धा पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते, ज्यावर बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवघ्या एकाच तासात एक कोटींची मदत उभारली आहे. तसेच, कृषी उत्पन्न बाजार समितीने गहू, ज्वारी आणि तांदळाची प्रत्येकी 50 पोती देऊ केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बारामतीच्या व्यापारी, नागरिक व अन्य विविध संस्थांचे पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार यांनी एक बैठक घेतली होती, ज्यात त्यांनी मदतीचे आवाहन केले. मदतकार्यासाठी ‘बारामती तालुका पूरग्रस्त निधी’ असे बँकेत खाते उघडावे व त्यामध्ये रक्कम जमा करावी, ज्या स्वरूपात मदत दिली जाईल, त्याची पावती देण्यात यावी असे शरद पवार यांनी सूचित केले होते. Sangli Flood: सांगली मध्ये पूर स्थिती कायम: 6 व्या दिवशीही बचतकार्य युद्धपातळीवर सुरू
शरद पवार ट्विट
साखर कारखाने, व्यापारी संस्थांनी साखर, धान्य, नवे कपडे, औषधं या गोष्टी देखील देण्याचे जाहीर केले. कोणत्याही आपत्ती प्रसंगी संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यास बारामतीकरांनी कधीही मागे पुढे पाहिले नाही. बारामतीकरांचा मला अभिमान वाटतो. सर्व दानशूर व्यक्ती व संस्थांचे मनापासून आभार!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 9, 2019
बारामती खरेदी-विक्री संघ, छत्रपती सहकारी साखर कारखाना, बारामती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थांनी त्यांच्या कामाचा एक दिवसाचा पगार मदतनिधीत देऊ केला आहे. याशिवाय, वीर सावरकर जलतरण तलाव 3 लाख रुपये, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी 5 लाख, महालक्ष्मी उद्योगसमूहाचे प्रमुख सचिन सातव यांनी 2 लाख 51 हजार अशी मदत केली. तसेच या संपूर्ण कार्यात आर्थिक मदतीसोबतच विविध संस्थांनी अन्नधान्याची सुद्धा सोय केली आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवार यांनी सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतकार्यावर लक्ष केंद्रित करण्याचे सूचित केले आहे.तसेच पूरस्थिती नियंत्रणात आल्यावर यात्रेबाबत नवीन कार्यक्रम जाहीर होईल