महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019: बारामतीतून अजित पवार यांना 50,000 मतांची आघाडी, गोपीचंद पडळकर यांचा पराभव होण्याची शक्यता
Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे आणि राज्याचे माजी पाटबंधारे मंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामती (Baramati) मतदारसंघात आघाडीवर आहेत. अजित पवार यांना 50,000 मतांची आघाडी मिळाली आहे. तर, त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेल्या गोपीचंद पडाळकर (Gopichand Padalkar) पिछाडीवर पडले आहे. आणि यामुळे, दुसऱ्या फेरीनंतर पडाळकर यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा अजित पवार यांना मोठा कल मिळण्याची चिन्हे पहिल्या फेरीनंतरच वर्तवली जात होती. यंदा भाजपच्या पडाळकरांना अत्यंत कमी मतं मिळाली असल्याने पवार यांची आघाडी वाढली आहे. मागील वर्षी अजित पवार याच मतदारसंघातून विजयी झाले होते. (महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी NDA ने पार केला बहुमताचा आकडा)

1991 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर बारामतीचे प्रथम आमदार झालेल्या पवारांचा या जागेवरून कधीही पराभव झाला नाही. सुरुवातीला ते 1991 आणि 1995 मध्ये दोनदा कॉंग्रेसचे आमदार होते. त्यानंतर, राष्ट्रवादी झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवायला सुरुवात केली आणि आतापर्यंत एकूण सहा वेळा बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. या जागेवरुन ते सातव्यांदाही निवडणूक लढवत आहेत. नोव्हेंबर 2010ते सप्टेंबर 2012 आणि पुन्हा ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014 या काळात राष्ट्रवादी-कॉंग्रेस (Congress) आघाडी सरकारमध्ये अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले होते. सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर अलीकडेच त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यावेळी पवार राजकारण सोडू शकतात अशीही चर्चा होती. मात्र, नंतर त्यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि बारामतीच्या जागेवरुन निवडणूक लढविली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतमोजणीच्या प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेच्या युतीने विरोधी राष्ट्रवादी-कॉंग्रेसला मागे टाकले आहे. मात्र, कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.