महाराष्ट्रावर आलेले कोरोना व्हायरस (Coronavirus) सारखे महाभयाण संकट परतवून लावण्यासाठी सर्व कोविड योद्धा तसेच नागरिकही प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको म्हणून महाराष्ट्रात अनेक इयत्तांच्या परीक्षा रद्द झाल्या आणि सरासरी गुणांनी उत्तीर्ण केले. त्यात CBSE आणि CISCE बोर्डाच्या 10 वी, 12 वीच्या परीक्षा जुलैमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्र हा रेड झोनमध्ये येत असल्यामुळे महाराष्ट्रात या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात वा सरासरी गुणांनी या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून दिल्ली बोर्डाला करण्यात येत आहे.
दहावीच्या परीक्षा केवळ ईशान्य दिल्लीतील शाळांमध्ये होणार आहेत. तर, देशातील इतर भागात दहावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार नाही. तसेच बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा संपूर्ण देशभरात होतील. सीबीएसई बोर्डाच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा 1 जुलै 2020 ते 15 जुलै 2020 या कालावधीत होतील, अशी माहिती निशांक यांनी गेल्या आठवड्यातच ट्वीटरच्या माध्यामातून दिली होती. मात्र महाराष्ट्रात जुलैमध्ये परीक्षा घेणे सद्य परिस्थिती पाहता शक्य नाही असे महाराष्ट्र बोर्डाचे म्हणणे आहे. CBSE Board Class 10th, 12th Exam Date 2020: सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक 'या' दिवशी होणार जाहीर
याबाबत उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. या चर्चेत महाराष्ट्रात CBSE आणि CISCE बोर्डाच्या 10 वी, 12 वीच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी पोखरियाल यांनी सीबीएसई 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा घेणार आहे आणि निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर होईल असे म्हटले होते. तसेच 9 वी आणि 11 वी साठीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देत असे म्हटले होते की, जर विद्यार्थी एखाद्या परीक्षेत नापास झाल्यास त्याला त्याची परिक्षा पुन्हा देता येणार आहे. तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आर्ट आधारित प्रोजेक्टमध्ये सहभागी करणार असल्याचे म्हटले होते.