Maharashtra: शिवसेना नेते अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांच्यावर ईडीचा छापा
Enforcement Directorate | (File Photo)

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यासह वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawli) यांच्या पाच शिक्षण संस्थांवर छापे टाकले आहेत. दरम्यान, ईडीने गैर व्यवहारप्रकरणी अनिल परब यांना समन्य बजावून 31 ऑगस्ट रोजी कार्यलयात हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, अनिल परब यांनी कार्यालयात हजर राहण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी मागितला आहे. तर, भावना गवळी यांनी त्यांना ईडीची कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे. ईडीने गवळी यांच्या संबंधित जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. ज्यात काही ट्रस्ट, महाविद्यालय, सामाजिक आणि व्यावसायिक संघटनाचा समावेश आहे.

भावना गवळी या शिवसेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. गवळी हे संसदेच्या खालच्या सभागृहात शिवसेनेच्या एकमेव महिला आहेत, त्या वाशिममधून दोनदा आणि वाशिम-यवतमाळ मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. दरम्यान, परब म्हणाले की, ही नोटीस कायदेशीर बाब आहे. आम्ही त्यास कायदेशीर मार्गाने सामोरे जाऊ. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वाद यात्रेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यावर राणे यांना अटक करण्यात आली, ज्यांना नंतर जामीन मिळाला आहे. हे देखील वाचा- Mumbai Police: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

अनिल परब यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे, याची माहिती संजय राऊत यांनीच दिली होती. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ माजली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी ईडीच्या नोटीस हे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नाही, प्रेमपत्र असल्याचे म्हटले होते. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात अयशस्वी ठरल्यानंतर अशा प्रेमपत्रांची संख्या वाढली आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला होता.