महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नाही आहे. फक्त अत्यावश्यक सेवासुविधांसाठी नागरिकांना घराबाहेर जाता येत आहे. परंतु काही ठिकाणी लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान आता धुळे (Dhule) येथे रस्त्यावर वाहनावरुन फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरात संचारबंदी आणि लॉकडाउनचे पालन न करणाऱ्यांवर ही कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यातील विविध ठिकाणी वैद्यकिय कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य अहोरात्र बजावत आहे. याच काळात त्यांच्यावर हल्ले केल्याच्या सुद्धा घटना समोर आल्या आहेत. आतापर्यंत राज्यात कलम 188 अंतर्गत 1,00,245 गुन्हे दाखल करण्यात आले असून 19,297 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 54,611 वाहने पोलिसांकडून जप्त केली असून 3,76,63,694 रुपयांची दंडवसूली करण्यात आली आहे.(Coronavirus In Pune: पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 9 मृत्यू आणि 111 नवीन कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांची नोंद)
#धुळे शहरात सकाळपासून पोलिसांनी रस्त्यावर वाहन घेऊन फिरणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू केली आहे. शहरात #संचारबंदी आणि #लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे.#lockdownindia@InfoDhule pic.twitter.com/U4gKiZoHzE
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) May 9, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 19 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांची सद्यची परिस्थिती गांभीर्याने घ्यावी असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तरीही नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसून येत आहेत. राज्यात आतापर्यंत 2,53,025 जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून 658 जणांनी क्वारंटाइनच्या नियमाचे उल्लंघन केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.