Coronavirus In Pune: पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 9 मृत्यू आणि 111 नवीन कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांची नोंद
Coronavirus| Representational Image| (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये मुंबई (Mumbai) व पुणे (Pune) याठिकाणी कोरोना व्हायरसची (Coronavirus) सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 9 मृत्यू आणि 111 नवीन कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 2,245 वर पोहोचली आहे. सध्या पुण्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहता, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्‍यासा,ठी 10 ते 17 मे पर्यंत कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश उपमुख्‍यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, मुंबई पाठोपाठ पुणे हे महत्‍त्‍वाचे शहर आहे. येथील कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण चिंता वाढविणारे असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्‍य राखीव पोलीस दलाची मदत घ्‍यावयाची असेल, तर तीही मदत उपलब्‍ध करुन दिली जाईल, असे उपमुख्‍यमंत्र्यांनी सांगितले. आज विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी पुणे विभागात 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 891 असल्याची माहिती दिली.

पुण्ये जिल्ह्यात लॉक डाऊनचे नियम शिथिल करत, बुधवार दि. 06 मे 2020 पासून ते 17 मे 2020 पर्यंत, 69 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये केवळ आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरु राहणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील उर्वरित मनपा क्षेत्रामध्ये एकल (स्वतंत्र) दुकान, रहिवाशी कॉलनीतील दुकाने, रहिवाशी संकुलातील दुकाने आणि गल्ली/रस्त्यालगतची दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुली ठेवण्याची परवानगी राहील. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज कोरोना व्हायरसचे 1089 नवीन रुग्ण; राज्यात एकूण बाधितांची संख्या 19063 वर, मुंबईमध्ये 11,967 संक्रमित लोक)

दरम्यान, आज महाराष्ट्रामधील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 1089 इतकी झाली, यासह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 19063 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासांत या आजारामुळे 37 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर कोविड-19 मुळे एकूण मृत्यूंची संख्या 731 झाली आहे. तर मुंबईत आज 748 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली व यासह एकूण रुग्णसंख्या 11,967 वर पोहोचली आहे.