अहमदनगर महापालिका महापौर निवडणुकीत (Ahmednagar Municipal Corporation Mayor Election)घडलेल्या राजकीय नाट्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Cm Devendra Fadnavis) यांनी सोमवारी (31 डिसेंबर) भाष्य केले. आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेला (Shivsena) अत्यंत संयत शब्दांत टोला लगावताना मुख्यमंत्री म्हणाले, 'अहमदनगरमध्ये आम्ही बिनशर्थ पाठिंब्यासाठी तयार होतो. पण, शिवसेनेकडून पाठिंबाच मागण्यात आला नाही. शिवसेनेकडून पाठिंब्याचा प्रस्ताव आला तर, कोणत्याही अटीशिवाय पाठिंबा द्या. असे मी आमच्या स्थानिक नेत्यांना सांगितले होते', असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
नगरमध्ये भाजपने नैसर्गिक मित्राची (शिवसेना) साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कसा घेतला अशा आशयाचा सवाल प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. या वेळी, 'आम्ही शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार होतो. पण, त्यांच्याकडून तसा कोणताही प्रस्ताव आला नाही. तसेच, तुम्हीच आमच्या नेत्यांशी संवाद साधा आणि आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ असे सांगा, असे स्थानिक शिवसैनिकांनी आम्हाला सूचवले. त्यामुळे काही काळ वाट पाहून आम्ही प्रसंगानुरुप निर्णय घेतला.', असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आमचे उमेदवार उभे होते. राष्ट्रवादीचा उमेदवार या निवडणुकीत नव्हता. तसेच, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही. केवळ आमच्या उमेदवाराला मते दिली आहे. त्यामुळे पाठिंब्याबाबत विचारायचे असल्यास तुम्ही त्यांनाच विचारा, असे म्हणत फडणवीस यांनी पाठिंब्याच्या प्रश्नाला बगल दिली. (हेही वचा, नगर पॅटर्न: लफडे जुनेच पण, अनैतिक संबध नसल्याचे सांगतात; राष्ट्रवादी-भाजप युतीवर शिवसेनेची टीका)
अहमदनगर महापालिकेतील पक्षीय बलाबल
- एकूण संख्याबळ – ६८
- शिवसेना – २४
- राष्ट्रवादी काँग्रेस – १८
- भाजपा – १४
- काँग्रेस – ५
- बसपा – ४
- अपक्ष – २
- समाजवादी पक्ष – १
दरम्यान, अहमदनगर महापालिका महापौर निवडणुकीत नाट्यमयरित्या भारतीय जनता पक्षाचा (BJP) उमेदवार निवडून आला. भाजपचे बाबासाहेब वाकळे हे अहमदनगरचे नवे महापौर झाले आहेत. या निवडणुकीत गोवा पॅटर्न पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या घड्याळाने भाजपच्या कमळाला हात दिल्याने अहमदनगर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. तर, अपुऱ्या संख्याबळामुळे पालिकेतील सदस्यसंख्येनुसार क्रमांक एकचा पक्ष असूनही शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकू शकला नाही. मतदानावेळी शिवसेनेने बहिष्कार टाकल्यामुळे महापौर भाजपचाच होणार हे स्पष्टच होते.