नगर पॅटर्न: लफडे जुनेच पण, अनैतिक संबध नसल्याचे सांगतात; राष्ट्रवादी-भाजप युतीवर शिवसेनेची टीका
Alliance Of NCP and BJP in Ahmednagar | (Archived, edited, representative images)

Ahmednagar Municipal Corporation Mayor Election: अहमदनगर महानगरपालिकेत संख्याबळाच्या (24) जोरावर क्रमांक एकचा पक्ष असूनही शविसेनेचा महापौर बनला नाही. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची स्थानिक पातळीवर युती ( Alliance Of NCP and BJP) झाल्याने भाजपचा महापौर, उपमहापौर निवडून आला आहे. या युतीवर भाजपचा सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेने तीव्र शब्दांत टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी पक्षाचे मुखपत्र सामनात लिहिलेल्या लेखात 'भाजप व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच आहे व आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत असे ते उगाच सांगत असतात. यानिमित्ताने दोघेही नागडे झाले आहेत व महाराष्ट्र त्यांच्यावर हसत आहे', अशा शेलल्या शब्दांत टीका केली आहे. पुढे ' राष्ट्रवादीने हा पाठिंबा बिनशर्त दिल्यामुळे दोघांचेही खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा दिसून आले. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन भाजपने महापौर बसवला हा शिवसेनेला धक्का वगैरे असल्याचे लिहिले आणि बोलले जात आहे. शिवसेनेला धक्का वगैरे बसण्याचे कारण नाही. राष्ट्रवादीचा पाठिंबा हा भाजपला मिळणारच होता. त्यांच्या पाठिंब्यावर नगरची गाढव चढाई घडली नसती तर मात्र आम्हाला धक्का बसला असता', असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

भाजपची खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे - शिवसेना

आपल्या लेखात, विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील त्यांच्या पुढार्‍यांना कवचकुंडले मिळवली व आता नगर महापालिकेत पाठिंबा देऊन केडगाव खून प्रकरणातील स्वतःच्या आमदारांना साफ करून घेतले. ही एक प्रकारे सौदेबाजीच म्हणावी लागेल. नगरमध्ये राष्ट्रवादीच्या सहकार्याने महापौर बसवला यासाठी भाजपचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. कारण नगरचा निकाल त्रिशंकू असला तरी भाजप हा तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला होता. एकूण 68 जागा आहेत व बहुमतासाठी किमान 35चा आकडा लागणार होता. शिवसेना 24, राष्ट्रवादी 18, भाजप 14, काँग्रेस 5, बसपा 4, बाकी इतर सटरफटर एक-दोन असे संख्याबळ होते. त्यामुळे शिवसेनेचा महापौर होऊ देणे हीच लोकभावना व कौल होता. एका बाजूला म्हणायचे शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. दोघांची विचारधारा हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होता कामा नये व दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीशी अनैसर्गिक, अनैतिक संबंध ठेवून सत्ताभोग घ्यायचा. खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे हे राष्ट्रवादीशी संबंध ठेवून भाजपने सिद्ध केले आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला आहे. (हेही वाचा, अहमदनगर: शिवसेनेच्या बहिष्कारामुळे, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर)

दरम्यान,'राष्ट्रवादी व भाजपचे लफडे नव्याने समोर आले. आता म्हणे राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांवर कारवाई होणार आहे. हे सर्व ढोंग आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा त्या पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना नगरमधील भाजप-राष्ट्रवादीच्या या ‘प्रकरणा’विषयी जराही कल्पना नव्हती असे आता सांगितले जात आहे. शरद पवार यांना माहिती होती की नाही हे त्यांचे त्यांनाच माहीत; पण नगरमधील ही ‘लोकशाही’ उद्या ‘बेबंदशाही’ होऊ शकते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षही तटस्थ राहिला म्हणे. राधाकृष्ण विखे-पाटलांचा हा जिल्हा; पण त्यांचेही आतून कीर्तन वरून तमाशा असेच सुरू असते. राष्ट्रवादीच्या पायात त्यांचीही टांग आहेच. भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे. महाराष्ट्रातील विद्यमान सरकारचा जन्मच मुळात राष्ट्रवादीसोबतच्या ‘अनैतिक’ संबंधातून झाला आहे. नगरमध्ये ते पुन्हा उफाळून आले आणि भाजपला तेथे महापौर-उपमहापौरपदाची प्राप्ती झाली', अशा तीव्र शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव टाकरे यांनी नगर पॅटर्नवर टीका केली आहे.