अहमदनगर: शिवसेनेच्या बहिष्कारामुळे, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर
Babasaheb Wakle | (छायाचित्र सौजन्य - फेसबुक)

Ahmednagar Municipal Corporation Mayor Election: अहमदनगर महापालिका महापौर निवडणुकीत नाट्यमयरित्या भारतीय जनता पक्षाचा (BJP) उमेदवार निवडून आला आहे. भाजपचे बाबासाहेब वाकळे हे अहमदनगरचे नवे महापौर झाले आहेत. या निवडणुकीत गोवा पॅटर्न पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या घड्याळाने भाजपच्या कमळाला हात दिल्याने अहमदनगर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. तर, अपुऱ्या संख्याबळामुळे पालिकेतील सदस्यसंख्येनुसार क्रमांक एकचा पक्ष असूनही शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकू शकला नाही. मतदानावेळी शिवसेनेने बहिष्कार टाकल्यामुळे महापौर भाजपचाच होणार हे स्पष्ट होते. अहमदनगरमधील महापौर व उपमहापौर पदासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता निवड सभा पार पडली. भाजपचे बाबासाहेब वाकळे (Babasaheb Wakle), शिवसेना (Shiv Sena) बाळासाहेब बोराटे आणि राष्ट्रवादीचे (NCP) संपत बारस्कर या तीन उमेदवारांमध्ये महापौर पदासाठी चुरस होती. अखेर भाजपचे वाकळे महापौर म्हणून निवडून आले. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली.

अहमदनगर महापालिकेतील पक्षीय बलाबल

एकूण संख्याबळ – ६८

शिवसेना – २४

राष्ट्रवादी काँग्रेस – १८

भाजपा – १४

काँग्रेस – ५

बसपा – ४

अपक्ष – २

समाजवादी पक्ष – १

महापालिका परिसरात मोठा बंदोबस्त

दरम्यान, तणावपूर्ण वातावरण पाहता महापालिका परिसराद मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापौर निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले होते. पण, पक्षीय बलाबल पाहता मतदानावेळी सदस्यांच्या उपस्थिती, अनुपस्थितीला फार महत्त्व होते. एका मतालाही मोठे महत्त्व होते. त्यातच शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याने वादग्रस्त ठरलेले नगरसेवक श्रीपाद छिंदम कोणाला मतदान करणार याबाबत उत्सुकता होती.  (हेही वाचा, अहमदनगर महापौर निवडणुकीदरम्यान श्रीपाद छिंदमला सेना नगरसेवकांकडून मारहाण)

छिंदमला शिवसेना नगरसेवकाकडून धक्काबुक्की

वादग्रस्त पार्श्वभूमी श्रीपाद छिंदम यांचे मत ग्राह्य धरायला कोणातही पक्ष तयार नव्हता. त्यामुळे सर्व गणीते ही छिंदम यांना वगळूनच जुळवली जात होती. पण, निवडणूक सुरु होताच छिंदम यांनी शिवसेनेलाच मतदान केले. त्यामुळे छिंदम यांचे मत ग्राह्य धरू नये अशी मागणी केली. या वेळी शिवसेना नगरसेवक इतके संतापले होते की, त्यांनी संतापाच्या भरात छिंदम यांना मारहाण केली. पोलिसांना हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.