श्रीपाद छिंदम (Photo credit : youtube)

शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी प्रकाशझोतात आलेले, वादग्रस्त अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना शिवसेना कार्यकर्त्यांनीच धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रियेवेळी हा प्रकार घडला. महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाचे बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे व राष्ट्रवादीचे संपत बारस्कर यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. यावेळी छिंदम यांनी शिवसेनेला मत दिले, त्यावर चिडलेल्या शिवसैनिकांनी ‘आम्हाला तुमच्या मताची गरज नाही’ अशी घोषणाबाजी करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा : शिवसेनेच्या बहिष्कारामुळे राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर)

अहमदनगरमधील एकूण नगरसेवकांची संख्या 68 आहे. मात्र अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांची साथ घेण्यास कोणताच पक्ष तयार नव्हता. अशातच छिंदम यांनी शिवसेनेला मत दिले. यावर चिडलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या सांगण्यावरूनच छिंदमने शिवसेनेला पाठींबा दिला असा आरोप केला. त्यामुळे चिडलेल्या सेना नगरसेवकांनी छिंदम यांचे मत ग्राह्य धरु नये, अशी मागणी करत, थेट छिंदम यांना मारहाण केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे प्रकरण आटोक्यात आले. आता या मारहाणीसंदर्भात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

दरम्यान महापौर पदासाठी राष्ट्रवादीचे संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे बाळासाहेब वाकळे हे महापौर पदी निवडून आले आहेत.