Maharashtra CID website hacked (Photo Credits: Twitter)

अलिकडेच झालेल्या दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सीआयडी (CID) ची वेबसाईट हॅक करुन मोदी सरकारसह पोलिस विभागाला इशारा देण्यात आला आहे. दिल्ली हिंसाचारादरम्यान मुस्लिमांवर हल्ले होत असल्याचे याद्वारे सांगण्यात येत आहे. 'Hacked by Legion. I am the Government of Imam Mahdi' असा मेसेज वेबसाईटवर पाहायला मिळत आहे. 'मुस्लिम सर्वत्र असून मुस्लिम बांधवांची ताकद जाणून घ्या. इमाम महादी लवकरच येत आहे,' असे पुढे लिहिलेले आहे. हिंदू जमावाकडून मुस्लिमांच्या हत्या होत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक मुस्लिम कुटुंबियांना आपले नातेवाईक गमवावे लागले. दिल्ली हिंसाचारात मृत्यू झालेल्यांपैकी बहुतांश जण मुस्लिम आहेत, असेही यात लिहिले आहे. यामुळे हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा हॅकर्सकडून प्रयत्न केला जात आहे. आता मात्र CID ची वेबसाईट पूर्ववत करण्यात आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या वेबसाईट mahacid.gov.in या लिंकवर क्लिक केल्यास हॅकर्सचा हा संदेश पाहायला मिळत होता. हॅकर्सची माहिती अद्याप मिळाली नसून त्यांचा शोध लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  (दिल्ली हिंसाचारानंतर मुंबईत कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कलम 144 लागू; रॅली, आंदोलनावर 9 मार्चपर्यंत बंदी)

नागरिकत्व सुधारणा कायदा यावरुन देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच CAA समर्थक आणि विरोधक यांच्यात दिल्लीत झालेल्या वादावरुन हिंसाचाराला तोंड फुटले. या हिंसाचारात 45 लोकांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक लोक जखमी झाले होते. याचे पडसाद देशभरात उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर वेबसाईट करत मोदी सरकारसह पोलिस दलालाही हॅकर्सने इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तराखंड पर्यटन विभागाची वेबसाईट हॅक झाल्याचे समोर आले होते.