Sanjay Raut (PC - ANI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) 7 मार्चला अयोध्येच्या दौऱ्यावर  (Visit to Ayodhya) जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत माहिती देण्यासाठी संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा कार्यक्रम तयार झाला आहे. अयोध्येच्या मुद्द्यावरुन राजकारण करू नये. हा आमच्या श्रध्देचा विषय आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर देशभरातील हजारो शिवसैनिक जाणार आहेत. अयोध्येमध्ये मुख्यमंत्री रामल्लाचे दर्शन घेतील. तसेच शरयू तीरावर आरती करतील. राम मंदिर हा आमचा श्रध्देचा विषय आहे. त्यामुळे यात राजकारण होता कामा नये, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. (वाचा - राजपथावरील पथसंचलनात केंद्राने नाकारलेला 'महाराष्ट्राचा चित्ररथ' आता प्रजासत्ताक दिनी शिवाजीपार्क येथील संचलनात दिसणार!)

दरम्यान, उद्धव ठाकरे आयोध्या दौऱ्यावर जाताना राहुल गांधी यांना घेऊन जाणार का? असा सवाल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप जम्मू-काश्मीरच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना अयोध्यात घेऊन जाणार होते का? असा उलट सवाल त्यांनी भाजपला केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निकाल दिला तेव्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. भाजपने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.