महाराष्ट्रात कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्याची ओळख 'पर्यटन जिल्हा' म्हणून आहे. मात्र अजूनही अपेक्षेप्रमाणे या भागात पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला नसल्याची स्थानिकांची भावना आहे. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या चेहरा मोहरा बदलण्यास सुरूवात झाली आहे. काल (9 जून) दिवशी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता वेंगुर्ला तालुक्यातील मौजे शिरोडा वेळागर येथे हे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारलं जाणार असून त्यासाठी ताज ग्रुपच्या मे. इंडियन हॉटेल्स कंपनीला भाडेपट्ट्याने जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील मौजे शिरोडा वेळागर (Shitole Velghar village) येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यासाठी ताज ग्रुपच्या मे. इंडियन हॉटेल्स कंपनीला 54.40 हेक्टर जमीन 90 वर्षाच्या कलावधीसाठी भाडेपट्टय़ाने देण्याचा निर्णय झाला आहे. परिणामी तळकोकणात असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पहिले पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रलंबित प्रोजेक्ट आता मार्गी लागण्यास सुरूवात होईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (Maharashtra Tourism Development Corporation) भूसंपादित केलेली जमीन भाडेपट्टय़ाने इंडियन हॉटेल्स कंपनीला देण्यात येईल आणि त्यांच्याकडून पुढील काम केले जाणार आहे.
आदित्य ठाकरे यांचे ट्वीट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथे ताज ग्रुपच्या हॉटेल स्थापनेसंदर्भात पर्यटन विभागाचा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल मी मंत्रिमंडळाचे आभार मानतो. जवळपास २२ वर्षांपासून हा प्रस्ताव रखडलेला होता परंतु महाविकास आघाडी सरकारने तो मंजूर करून घेतला.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 10, 2020
सिंधुदुर्गात चिपी विमानतळदेखील उद्धाघटनासाठी सज्ज आहे. दरम्यान 1 मे महाराष्ट्र दिनी ते खुलं केले जाणार होतं. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तो सोहळादेखील लांबणीवर पडला आहे.
दरम्यान काल मंत्रिमंडळामध्ये पर्यावरण खात्याचं नाव देखिल ‘पर्यावरण व वातावरणीय बदल' विभाग’असं करण्यात आलं आहे.