महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या पहिला अर्थसंकल्प आज शुक्रवार, 6 मार्च रोजी सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळात हा अर्थसंकल्प मांडला. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने शेतकरी, महिला, तरूणाई तसंच इतर क्षेत्रांसाठी काय तरतुदी केल्या जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र ठाकरे सरकारच्या हा पहिला अर्थसंकल्प नाट्य, चित्र क्षेत्रासाठी दिलासादायक ठरला आहे. या अर्थसंकल्पात नाट्यसंमेलनाच्या निधीत वाढ करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. यानुसार आता नाट्यसंमेलनासाठी 10 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. (शेतकरी, तरूण ते महिलांसाठी महाराष्ट्र अर्थसंकल्प 2020-21 मध्ये करण्यात आल्या 'या' महत्त्वाच्या घोषणा)
विशेष म्हणजे मुंबईतच मराठी भवन उभारणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तर वस्तू आणि सेवा कर केंद्राची उभारणी मुंबईतील वडाळा येथे करण्यात येईल. यासाठी 148 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुणे जागतिक चित्रपट महोत्सवासाठी 4 कोटी आणि सारथी संस्थेसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसंच क्रिडा क्षेत्र आणि शाळांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. (अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणेकरांसाठी 7 मोठ्या घोषणा)
या सोबतच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाहतूक व्यवस्था, आरोग्य, शिक्षण आणि महिला या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करण्यात आले. तसंच शेतकरी, महिला यांच्यासाठी खास सुविधा देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठीही सरकार प्रयत्नशील असेल, असेही अजित पवार म्हणाले.