Maharashtra Board Exams 2022: बोर्ड परीक्षेत कॉपी पुरवणार्‍या शाळांची मान्यता रद्द होणार; शालेयमंत्री वर्षा गायकवाड यांचे कडक आदेश
Varsha Gaikwad | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात आता कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर बोर्डाने पुन्हा दोन वर्षांनंतर पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेण्याचं आव्हान घेतलं आहे. दरम्यान बोर्डाच्या परीक्षा यंदा सुरक्षित वातावरणामध्ये आणि कोविड 19 नियमावलीचं पालन करून घेतल्या जात आहे. विद्यार्थ्यांवरील दडपण कमी करण्याच्या उद्देशाने यावर्षी शाळेतच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिली आहेत. पण याचा गैरफायदा घेत काही ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. काल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये (Vidhan Parishad) बोलताना 'असा प्रकार करणार्‍या शाळांची मान्यता रद्द केली जाईल' असा निर्णय जाहीर केला आहे.

दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नीलजगाव, ता. पैठण मध्ये कॉपीचा प्रकार समोर आला होता. शिक्षण विभागाने त्याची दखल घेतली असून झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले आहेत आणि त्यामुळे त्यांची मान्यता रद्द केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Board SSC Exam 2022: औरंगाबाद मध्ये 10वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट देण्यासाठी संस्थाचालकाकडून 30 हजार घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर; प्रत्यक्ष लाच घेताना अटक .

पहा वर्षा गायकवाड यांचा निर्णय

यंदा 10वी, 12वीच्या परीक्षा कोरोना संकटाच्या सावटाखाली घेतल्या जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी हॉल तिकीट देताना फी न भरलेल्यांचीही अडवणूक शाळा, कॉलेज कडून होत असल्याचं पहायला मिळालं आहे पण त्यावरही पर्यायी पद्धतीने विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. तसेच हॉल तिकीटासाठी अडवणूक करणार्‍या शाळेच्या मुख्यध्यापकांवरही शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचं बच्चू कडूंनी पूर्वीच जाहीर केले आहे.

राज्यात 15 मार्चपासून सुरू झालेल्या बोर्ड परीक्षा 4 एप्रिल पर्यंत चालणार आहेत.