Maharashtra Board SSC Exam 2022: औरंगाबाद मध्ये 10वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट देण्यासाठी संस्थाचालकाकडून 30 हजार घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर; प्रत्यक्ष लाच घेताना अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात आजपासून बारावी पाठोपाठ दहावीच्या (SSC Exams) देखील परीक्षा सुरू झाल्या आहेत. दरम्यान कोरोना संकटाच्या सावटाखालीच यंदा ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थी सामोरं जात आहेत. पण मुलांवरील परीक्षांचं दडपण दूर करत सुरक्षित वातावरणात परीक्षा घेण्यासाठी बोर्ड सज्ज असताना औरंगाबादमध्ये (Aurangabad) मात्र एकाला दहावीचं हॉलतिकीट (SSC Exam Hall Ticket) घेण्यासाठी 30 हजार रूपये मोजावे लागले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

औरंगाबाद मध्ये कलावती देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एसपी जवळकर यांनी बहि:स्थ विद्यार्थ्याकडे 10वीच्या परीक्षेचं हॉल तिकिट देण्यासाठी 30 हजार रूपये मागितले. त्यामध्ये 10 हजार रूपये घेताना पोलिसांनी संबंधित संस्थाचालकाला अटक झाली आहे. शाळेची लिपिक देखील या लाचखोरीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी होती. तिच्या विरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळ परिसरात बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यात 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्यात काही मुख्याध्यापक, संस्थाचालक अडवणूक करत असल्याचं समोर आल्याचे म्हणाले होते. यावर पर्याय म्हणून तालुका स्तरावर केंद्र प्रमुखांकडून हॉलतिकीट घेण्याचं त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते सोबतच संबंधित मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई देखील होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होते. नक्की वाचा:  Maharashtra Board HSC, SSC हॉलतिकीटसाठी अडवणूक करणार्‍या मुख्याध्यापकांना सरकारचा दणका; तालुकास्तरावर केंद्रप्रमुखाकडून हॉल तिकीट देण्याची पर्यायी व्यवस्था - मंत्री बच्चू कडू यांची माहिती.

दहावीच्या ऑफलाईन बोर्ड परीक्षा यंदा 15 मार्च ते 4 एप्रिल या काळात पार पडणार आहे. कोरोना संकट आटोक्यात असलं तरीही कोविड नियमावलीचं पालन करत आणि सुरक्षेचे नियम पाळत यंदा राज्यभर परीक्षा पार पाडण्याचं आवाहन सध्या बोर्डासमोर आहे. बारावीच्या काही पेपर मध्ये पेपरफूटीचे प्रकार देखील समोर आले आहेत.