महाराष्ट्रामध्ये वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंदिरं, मशिदी,चर्च सह सारी प्रार्थनास्थळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने प्रार्थनास्थळ उघडण्यास परवानगी दिली असली तरीही महाराष्ट्र राज्य सरकारकडून अद्याप प्रार्थनास्थळ उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मागील 6 महिन्यांपासून बंद असलेल्या मंदिरांना आता सणासुदींच्या काळात खुली करा अशा मागणीसाठी आता महाराष्ट्र भाजप (Maharashtra BJP) एकवटलं आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मंदिरांबाहेर भाजप कार्यकर्ते साधू-संतांसोबत एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर आता पोलिसांनीदेखील आपला बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई मधील प्रभादेवी जवळील सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple) , पुण्याचे श्रद्धास्थान तांबडी जोगेश्वरी मंदिर (Tambadi Jogeshwari Temple) तसेच शिर्डी (Shirdi), कोल्हापूर (Kolhapur) मध्येही पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागपूर मध्ये प्रवीण दटकेंच्या नेतृत्त्वामध्ये आंदोलन सुरू झाले आहे. यावेळेस टाळ,मृदुंगाच्या नादासोबत भजनं गायली जात आहेत. Maharashtra Unlock 5 Guidelines: महाराष्ट्र सरकारने जारी केल्या अनलॉक 5 च्या मार्गदर्शक सूचना; राज्यात 50 टक्के क्षमतेसह हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यास परवानगी
आज भाजपा कार्यकर्ते राज्यातील मंदिरांभोवती घंटानाद आंदोलन आणि लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत. दरम्यान येत्या शनिवार पासून नवरात्र उत्सव 2020 ची सुरूवात होत आहे त्यापुढे कोजागिरी, दिवाळीचा सण आहे. या काळात मोठ्या प्रमाणात भाविक देवदर्शन घेतात. त्यामुळे त्यांची ताटातूट नको. तसेच मंदिरांवर अनेकांच्या उपजीविका अवलंबून आहेत. त्यांचे 6 महिन्यात मोठे नुकसान झाले आहे. यासाठी आता मंदिरं उघडी करा अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी पूजार्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या होत्या. तर शिर्डीमध्ये भाज्पा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील शिर्डीतील साईबाबा मंदिरं उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती दिली होती. येत्या 17 ऑक्टोबरपासून राज्यात घटस्थापना करुन नवरात्रोत्सवाला सुरूवात होत आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता मंदिरं उघडा अशी मागणी तीव्र होत आहे. मात्र सरकारने अद्याप मंदिरं उघडण्याच्या प्रस्तावावर माहिती दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना गर्दी टाळत व्यवहार पुन्हा हळूहळू सुरू केले जातील असं सांगितलं आहे. त्यामुळे तातडीने प्रार्थनास्थळं उघडण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे.