Rohit Pawar (Photo Credits: Twitter)

Maharashtra Assembly Elections 2019 Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल  हाती यायला आता अवघे काहीच तास शिल्लक आहेत. राजकीय मंडळींपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनातील धाकधूक वाढली आहे. पण या परिस्थितीत एकीकडे  अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात मात्र आधीपासूनच राष्ट्रवादीचे (NCP) उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या विजयाचे सेलेब्रेशन सुरु झाले आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांनी तर मतमोजणीच्या आधीच रोहित दादांच्या विजयासाठी अभिनंदन करणारे बॅनर सुद्धा झळकावले आहेत तर काहींनी फटाके फोडून निकालपूर्व आनंद साजरा केला आहे.

मटा ऑनलाईनच्या ट्विटनुसार, राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे उमेदवार रोहित पवार यांच्या विजयाचे पोस्टर कर्जतमध्ये लावण्यात आले आहे. रोहितदादा पवार याचं प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल अभिनंदन, असा मजकूर या फलकांवर लिहिलेला आहे. या फलकावर रोहित पवार यांचा भला मोठा फोटो असून सोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासहित राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत.

कर्जत-जामखेड, कोथरूड, कणकवली, परळी, सातारा लोकसभा निवडणूक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष; काही शे, हजारांत सामना सुटण्याची शक्यता

यापूर्वी सुद्धा पुण्यातील शिवाजी नगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे विजयी झाल्याचा दावा करत त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले होते. तर कागलमधील राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ आणि दापोली येथे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनी देखील विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला होता.

दरम्यान, कर्जत जामखेड या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला होता. याठिकाणी भाजपाचे विद्यमान आमदार राम शिंदे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीने शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना उमेदवारी दिली होती. मतदानाच्या पूर्वी प्रचारसभेतही याठिकाणी राष्ट्रवादीने जोर लावला होता तर आचारसंहिता लागू व्हायच्या ऐन काही क्षण आधी अमित शहा यांना कर्जत मधील सभा रद्द करावी लागली होती. या साऱ्यामुळे हा मतदारसंघ उद्याच्या निकालाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. ही लढत नेमकी कोणाच्या पारड्यात झुकणार हे पाहणे जरी महत्वाचे असले तरी निकालाच्या पूर्वीच कर्जत मध्ये लावण्यात आलेले रोहित यांच्या विजयाचे बॅनर पाहता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.