Babasaheb Purandare (Photo Credit - Twitter)

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) दिवशी सर्व मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठी सुट्टी असते. परंतु, अनेक मतदार यादिवशी मतदान न करता फिरायला जाण्याचा विचार करतात. मात्र, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, (Babasaheb Purandare) प्रकाश पवार, (Prakash Pawar) नीलिमा लोया, (Nilima Loya) आदी मंडळींनी अशा लोकांपुढे एक आदर्श उभा केला आहे. पुण्यातील पर्वती येथे बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या ९७ व्या वर्षी मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच नाशिकमधील डायलिसिसचे रुग्ण प्रकाश पवार आणि नीलिमा लोया या 81 वर्षीय आजींनी बायपासची शस्त्रक्रिया झालेली असतानाही आपल्या पतीसोबत मतदानाचा हक्क बजावला.

बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं मतदारांना आवाहन -

बाबासाहेब पुरंदरे यांनी मतदान केल्यानंतर मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी बाबासाहेब म्हणाले की, मतदान करण हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे मी माझे कर्तव्य बजावण्यासाठी येथे आलो आहे. मला मतदानासाठी कोणीही जबरदस्तीने गाडीत बसवलेलं नाही. तसेच कोणीही पैसे दिले नाहीत. मतदानाचा हक्क बजावताना एक वेगळा आनंद असतो, असंही ते म्हणाले.

106 वर्षीय आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क -

शिर्डीतील छबूबाई भगिरथ कुऱ्हे या 106 वर्षीय आजीबाईंनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील बेलापूर गावात त्यांनी आपले कर्तव्य बजावले.

हेही वाचा - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ते धननंजय मुंडे यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा आज मतदार करणार फैसला

डायलिसिसचे रुग्णाने बजावला मतदानाचा हक्क -

नाशिकमधील प्रकाश पवार हे डायलिसिसचे रुग्ण आहेत. त्यांच्यावर आठ दिवसांपासून रुग्णालायात उपचार सुरू आहेत. पवार यांना डॉक्टरांनी रुग्णालायातून बाहेर पडू नका, असा सल्ला दिला होता. परंतु, तरीदेखील त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

81 वर्षीय आजींवर बायपासची शस्त्रक्रिया झाली असतानाही बजावला हक्क –

नाशिकमध्ये नीलिमा लोया या 81 वर्षीय आजींनी बायपासची शस्त्रक्रिया झालेली आहे. तसेच त्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे. परंतु, या सर्व अडचणींची पर्वा न करता नीलिमा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

राज्यमंत्री अविनाश महाटेकर यांच्या आईने वयाच्या 90 व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क -

राज्यमंत्री अविनाश महाटेकर यांच्या आईने वयाच्या 90 व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी महाटेकर आपल्या सर्व कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते.

आज संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. राज्यात आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. राज्यात अनेक भागांत सध्या पाऊस कोसळत आहे. परंतु, तरीदेखील मतदार आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत.