महाविकासआघाडी सरकार शेतकऱ्यांचा पाठिराखा म्हणन काम करेन: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray | (Photo Credit: Facebook)

कमी आमदार असतानाही करुन दाखवलं असा टोला भाजपला लगावत हे सरकार म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेला चमत्कार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. तसेच, महाविकासआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) हे शेतकऱ्यांचा पाठिराखा म्हणून काम करेन अशी ग्वाही देत, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहीजे आणि आम्ही तो करणारच, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute) आयोजित कार्यक्रमात ते पुणे येथे बोलत होते. (हेही वाचा, राज्यात एकही डिटेंशन सेंटर होणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला स्थगिती दिली)

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या भावनेला हात घालत आणि विरोधकांवर टोलेबाजी करत आपल्या खास शैलीत भाषण केले. सध्या महाराष्ट्रच नव्हे तर देशासह संपूर्ण जगाचीही अर्थव्यवस्था काहीशी संकटात आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

एएनआय ट्विट

दरम्यान, गेल्या सरकारमध्ये आम्ही अर्धवट होतो. अर्धवट होतो म्हणजे आम्ही अर्धवट होतो असे नव्हे तर, सरकारमध्ये आमचा सहभाग अर्धवट होता. त्यामुळे आम्ही थेट निर्णय प्रक्रियेत नव्हतो. त्यामुळे या आधिच्या सरकारमध्ये निर्णय होत. परंतू, ते निर्णय बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असे होते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

एएनआय ट्विट

दरम्यान, हे सरकार नवे आहे. पदावर मीही नवा आहे. पण आमच्यात समन्वय आहे. विविध गोष्टी मी समजून घेत आहोत. त्यासाठी शेती, अर्थकारण अशा विविध विषयांवर जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अजित पवार यांची मदत होते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यावर विशेष लक्ष देण्यावर जोर दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, अजित पवार, रोहित पवार यांच्यासह विविध पक्षांचे अनेक नेते या कार्यक्रमास उपस्थित होते.