राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session) यंदा जनहीताच्या मुद्द्यांऐवजी मंत्र्याचा राजीनामा आणि पोलीस अधिकाऱ्याची बदली यावरुनच अधिक गाजले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा, मनसूख हिरेन मृत्यू प्रकरण आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या निलंबनाची मागणी हे मुद्दे प्रामुख्याने या अधिवेशनात चर्चेत आले. विरोधी पक्षनेत्यांची भूमिका बजावणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रविण दरेकर यांनी या मुद्द्यांवरुन विशेष आक्रमकता दाखवली. काही प्रामाणात राज्यातील महाविकासआघाडी सरकारही बॅकफूटला गेल्याचे चित्र पुढे आले.
या अधिवेशनात फडणवीस आणि दरेकर या जोडगोळीने विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहामध्ये नियमांवर बोट ठेऊन तडाखेबंद खेळी केल्याचे पाहायला मिळाले. विविध विषयांवर सरकारला कोंडीत पकडत आपल्याला अनुकूल निर्णय घेण्यास भाग पाडल्याचेही पाहायला मिळाले. याचा परिणाम अधिवेशनाच्या सुरुवातीलाच पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा सरकारला घ्यावा लागला. तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करावी लागली. (हेही वाचा, Mansukh Hiren Death Case: सचिन वाझे यांची बदली; महाविकासआघाडी सरकार कोणासही पाठिशी घालणार नाही- अनिल देशमुख)
दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या ताब्यात असेले सीडीआर मिळवत विधानसभेत सरकारव केलेले प्रहार विशेष उल्लेखनीय ठरले. या सीडीआरमुळे राज्य सरकारवर नैतिक दबाव तर आलाच परंतू, सरकारला बॅकफूटवरही जावे लागले.
राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता 1 मार्च 2021 पासून सुरु झालेले अधिवेशन आज दिनांक 10 मार्च 2021 पर्यंत विधान भवन, मुंबई येथे पार पडत आहे. या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोनामुळे राज्य सरकारला अर्थसंकल्प सादर करताना बरीच कसरत करावी लागली.