Mansukh Hiren Death Case: सचिन वाझे यांची बदली; महाविकासआघाडी सरकार कोणासही पाठिशी घालणार नाही- अनिल देशमुख
Sachin Vaze, Anil Deshmuk | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मनसुख हिरेन प्रकरणी (Mansukh Hiren Death Case) चर्चेत आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze ) यांची क्राईम ब्रँच विभागातून इतर ठिकाणी बदली करण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांनी विधानपरिषद सभागृहात ही माहिती दिली. सचिन वाझे यांना निलंबीत करा अशी मागणी करत विरोधी पक्ष या आधीच आक्रमक झाला होता. विधानपरिषदेत विरोधी पक्षाचा हाच आक्रमकपणा आजही पाहायला मिळाला. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला गृहंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात उत्तर दिले.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे त्यांना पदावरुन निलंबीत करावे अशी मागणी राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. हीच मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही लावून धरली. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन प्रकरणी विधान परिषद सभागृहात आज जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. सभागृह काही काळ स्थगित करावे लागले. (हेही वाचा, Mansukh Hiren Death Case: मनसूक हिरेन यांच्या पत्नीचा Sachin Vaze यांच्यावर गंभीर आरोप; सचिन वाझे यांची त्रोटक प्रतिक्रिया)

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणी राज्य सरकार बचावात्मक पवित्रा घेत असल्याची चिर्चा आहे. दुसऱ्या बाजूला सचिन वाझे आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लक्ष घातले आहे. शरद पवार यांनी या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली असे वृत्त आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहीशीही फोनद्वारे चर्चा केली आहे. तसेच, दोन्ही नेत्यांमध्ये आज सायंकाळी भेट होणार असल्याचे समजते.