प्रातिनिधिक प्रतिमा (फाइल फोटो )

नव्या सरकारच्या काळात इंधनांच्या किमती अक्षरशः गगनाला भिडत असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकींचे निकाल आल्यावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. त्यानंतर एप्रिलमध्ये घरगुती गॅस सिलिंडर (LPG Gas) च्या किमतीही वाढल्या. आता परत एकदा सिलिंडरच्या किमती 25 रुपयांनी वाढल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सबसिडी नसलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत सध्या 709.50 रुपये इतकी झाली आहे. तर सबसिडी असलेला सिलेंडर 1.23 रुपयांनी महागून 495.09 रुपये इतका झाला आहे.

1 एप्रिलपासून गॅस सिलेंडर महागून नवे दर लागू करण्यात आले होते. त्यानुसार सबसिडी नसलेल्या सिलेंडरची किंमत 5 रुपयांनी वाढली होती, तर सबसिडी मिळत असलेला सिलेंडर मुंबईत 29 पैशांनी महाग झाला होता. आता काही दिवसांतच पुन्हा एकदा या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे सबसिडी नसलेल्या सिलेंडरसाठी 709.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. IOC च्या वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार विविध शहरांत सबसिडी मिळणाऱ्या सिलिंडरच्या  किंमती – दिल्ली - 497 रुपये, मुंबई - 495.09 रुपये, कोलकाता - 500.52 रुपये, चेन्नई - 485.25 रुपये. दरम्यान, नोव्हेंबर 2018 मध्ये गॅसची किंमत सर्वाधिक होऊन 912 रुपये इतकी झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये ती उतरून 630 पर्यंत पोहचली होती. आता परत एकदा सिलिंडरने 700 चा आकडा पार केला आहे.