महाराष्ट्रात लाऊडस्पीकर (Loudspeakers) आणि हनुमान चालिसा यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतेच औरंगाबादेत सभा घेतली. यावेळी पुन्हा त्यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा मुद्दा उपस्थित केला. संबोधनादरम्यान राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देत 4 मे पर्यंत मशिदींच्यावर लावलेले लाऊडस्पीकर हटवण्यास सांगितले आहेत. यावरून माजलेल्या गदारोळादरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊ शकतात, असा अहवाल गुप्तचरांना मिळाल्याचे महाराष्ट्र गृह विभागाने मंगळवारी सांगितले.
राज्यातील हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने याबाबत इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे पोलीस प्रमुख रजनीश सेठ यांनी आज सांगितले की, औरंगाबादचे पोलीस आयुक्त मनसे नेते राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर विरोधात केलेल्या भाषणाबद्दल योग्य कायदेशीर कारवाई करतील. 13,000 हून अधिक लोकांना CrPC च्या कलम 149 अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.
Intelligence has received reports that people from other states might come to Maharashtra to disturb the law and order situation in the state: Maharashtra Home Department
— ANI (@ANI) May 3, 2022
याच औरंगाबादच्या सभेत ठाकरे यांनी लोकांना मशिदीबाहेरील लाऊडस्पीकर 4 मे पर्यंत न काढल्यास हनुमान चालीसा वाजवण्यास सांगितले होते. याबाबत मंगळवारी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील, सेठ आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मनसे प्रमुखांच्या अल्टीमेटमच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर, ‘महाराष्ट्र पोलीस कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहेत. राज्यात एसआरपीएफ (SRPF) आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज आहेत आणि जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,’ असेही सेठ म्हणाले. (हेही वाचा: राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, सांगली जिल्ह्यातील शिराळा कोर्टाचे आदेश)
डीजीपी सेठ यांनी माहिती दिली की, राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून राज्यभरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील, ‘पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये,’ असे आदेश दिले आहेत.