Sandeep Deshpande | (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्रभर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अनधिकृत भोंगे उतरवण्यासाठी आग्रही आहे. राज्य सरकारला मनसेने (MNS) दिलेले अल्टिमेटम काल (4 मे ) दिवशी संपल्यानंतर राज्यभर त्यांनी आक्रमक हऊन आंदोलन सुरू केले आहे. अशातच प्रतिबंधात्मक कारवाई करताना काही महत्त्वाचे मनसे नेते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शिवतीर्थ या मनसे प्रमुखांच्या निवासस्थानावरून बाहेर पडल्यानंतर शिवाजी पार्क परिसरामध्ये संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांनाही ताब्यात घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला होता. पण पोलिसांना चकवा देत संदीप देशपांडे, संतोष धुरी पळ काढण्यात यशस्वी झाले आहेत. Loudspeaker Controversy: 'सर्व बेकायदेशीर लाऊडस्पीकर काढून टाकेपर्यंत मशिदीबाहेर हनुमान चालीसा वाजवत राहू'- मनसे अध्यक्ष राज ठाकरे .

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांना चकवून पोबारा करण्यात यशस्वी झाले असले तरीही यावेळी झालेल्या धक्काबुक्की मध्ये एक महिला पोलिस कर्मचारी पडली आणि त्याचवरून आता संदीप देशपांडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या या प्रकरणी त्यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे.

दरम्यान संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय समजले जाणार्‍या संतोष साळी या व्यक्तीला काल रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांचा तपास सुरू आहे. देशपांडे स्वतः अजून समोर आले नसले तरीही त्यांनी एक व्हिडिओ जारी करत आपण पोलिसांना कायम सहकार्य केले आहे. पोलिस जेव्हा जवळ आले तेव्हा ते आपल्याला ताब्यात घेत आहेत का? हे वारंवार विचारले होते पण त्यांनी केवळ बाजूला या असं म्हटलं होतं. तसेच माझ्या धक्क्याने किंवा गाडीने महिला पोलिस कर्मचारी पडलेली नाही असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

शिवाजी पार्क परिसरातील हा प्रकार पाहून काल गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी पोलिसांना देशपांडेंविरूद्ध कारवाईचे आदेश दिले होते.